ठाणे | 24 जुलै 2023 : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून तर ठाणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला आहे. पूर्व द्रूतगतीमार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. गेल्या पाऊण तासापासून ठाणेकर वाहतूक कोंडीत अडकले असून त्यांचं मुंबईत येणं मुश्किल झालं आहे.
ठाण्याकडून मुंबईला जाणाऱ्या या पूर्व द्रूतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोढी झाली आहे. शेकडो वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत. अनेक रुग्णवाहिकाही या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या आहेत. त्यांना जायला जागाही मिळत नाहीये. सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच वाहतुकीची कोंडी झाली आहे.पाऊण तासापासून वाहने जागची हालत नाहीयेत. पावसामुळे कारच्या बाहेर पडता येत नाहीये. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड कोंडी झाली आहे.
सोमवार असल्याने आठवड्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या लोकांचे चांगलेच हाल होत आहेत. लोकलसेवेवर परिणाम झाला तर अडकून पडावे लागणार असल्याची भीती असल्याने अनेकजण वाहने घेऊ घरातून बाहेर पडली आहेत. मात्र, पाऊस, खड्डे यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने या चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी या भागात पावसाने रात्रीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. या भागात थांबून थांबून पाऊस पडत आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे. परिणामी या भागात वाहतुकीचा खोळंबा झालेला नाही. ठाणे जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने आज मुंबईला येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सध्या मुंबईच्या उपनगरातील अंधेरी, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि जोगेश्वरीमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. कुठेही पाणी साचलेले नाही, ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. अंधेरी सबवे देखील वाहतुकीसाठी खुला असल्याचे दिसत आहे.