कल्याण : नायजेरियामधून 3 डिसेंबर रोजी डोंबिवलीत आलेल्या चार जणांचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू करून पालिका प्रशासनाने त्यांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी लॅबमध्ये पाठवले होते. या दरम्यान या चौघांना केडीएमसीच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चौघांची प्रकृती स्थिर होती. या चारही रुग्णांच्या ओमिक्रॉन अहवालाची प्रतीक्षा असतानाच 15 दिवसानंतर या रुग्णाची केलेली आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्याने आज शुक्रवारी सकाळी या चौघांना डिस्चार्ज देण्यात आला. या चौघाना सात दिवसांचा होम क्वांरटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र संध्याकाळी या चौघांमधील 45 वर्षीय रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली असा अहवाल केडीएमसी प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.
दरम्यान रुग्णाचा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह अहवाल व डिस्चार्ज एकाच दिवशी आला आहे. अहवालासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने ओमिक्रॉन रोखणार तरी कसा? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका लसीकरणासाठी करत असलेल्या सर्व्हेक्षणात 4 जणांचे कुटुंब नायजेरियातून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास मिळाली. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी या चारही जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. 3 डिसेंबर रोजी चारही जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. चौघांपैकी एक दहा वर्षाचा मुलगा व एक 6 वर्षाची मुलगी आहे. या कुटुंबापैकी पती-पत्नी दोघांचेही कोविड लसीकरणाचे दोन्ही डोसेस झालेले आहेत. या चौघांचे नमुने 4 डिसेंबर रोजी जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल प्रलंबित होता तर अहवालाच्या प्रतीक्षेत 15 दिवस या सर्व रुग्णांना पालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये निगराणी खाली ठेवण्यात आले होते.
15 दिवसानंतर नियमानुसार या सर्व रुग्णांची पुन्हा आरटी पीसीआर तपासणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दुपारी घरी पाठवण्यात आले. विशेष म्हणजे रुग्ण उपचारानंतर घरी परतल्यानंतर संध्याकाळी या रुग्णाचा अहवाल तब्बल 15 व्या दिवशी प्राप्त झाला. आज त्यापैकी 45 वर्षीय पुरुषाचा चाचणी अहवाल ओमिक्रॉन पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान सदर कुटुंबातील चारही व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल, विलगीकरण कक्षातील उपचाराअंती निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज दुपारी महापालिकेच्या विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. सदर कुटुंबाचे 24 हाय रिस्क व 62 लो रिस्क काँटॅक्ट अशा 86 लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता त्यातील 4 निकट सहवासीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले असून त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (In Kalyan, after the patient was cured and went home, the report of Omicron came positive)
इतर बातम्या
निधीबाबतचा पुरावा द्या, नाही तर गुन्हा दाखल करू; शिवसेनेचा भाजप आमदाराला इशारा