ठाणे : कल्याण महात्मा फुले पोलिसांनी पाच बांगलादेशी महिलांना अटक केली. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून बातमीदारांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर 5 बांगलादेशी महिलांसह एका भारतीय नागरिकाला भारतात अनधिकृतपणे घुसखोरीच्या आरोपात बेड्या ठोकल्या. रितिका मंडल, लुथफा बेगम जहाँगीर आलम, जोरना जलालमियाँ अख्तार, मासुमा जमीरउद्यीन अशी घुसखोर महिलांची नावं आहेत. यात एक अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. सध्या कल्याण महात्मा फुले पोलिसांनी या पाच महिलांसह मुख्य महिला आरोपी रितिका मंडल हिचा साथीदार रघुनाथ मंडल यालाही अटक केली. पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या प्रकारामुळे बाहेरच्या देशातून बिनधास्तपणे नागरिक घुसखोरी करत असल्याने सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे.
कल्याण स्टेशन परिसरात बांग्लादेशी महिलांचा वावर आहे. अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतीभा माळी यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाणे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी स्टेशन परिसराची पाहणी केली. ५ महिला आणि १ पुरुषावर संशय आला. त्यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना हिन्दी, मराठी किंवा इंग्रजी अशी कोणतीही भाषा येत नव्हती.
त्यांच्याकडे भारतीयत्वाचे कोणतेही पुरावे नव्हते. या महिलांना ब्युटी पार्लरमध्ये काम देण्याचे आमिष दाखवण्यात आले. बांगलादेशातून बोलावून घेण्यात आल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे यामध्ये मुख्य भूमिका बजावत असणारी रितिका मंडल ही महिला बांग्लादेशी नागरिक आहे. सुरुवातीला डान्स बारमध्ये काम करायची. तिने रघुनाथ मंडल याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर त्याच्याबरोबर ती डोंबिवलीमध्ये राहण्यास आली. हे दोघे मागील पाच वर्षांपासून एकत्र राहत होते.
याच दरम्यान दोघांनी मिळून मागील दोन वर्षात काही मुली, महिलांना ब्युटी पार्लरमध्ये काम देण्याच्या बहान्याने भारतात आणले. नवी मुंबईच्या बारमध्ये कामाला लावले. असे पोलीस तपासात उघड झाले. पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत. मात्र या प्रकारामुळे बाहेरच्या देशातून बिनधास्तपणे नागरिक घुसखोरी करत असल्याने सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. अन्य एक महिला ही नाव बदलून भारतात राहत असल्याची माहितीही समोर आली आहे.