ठाणे: मुलगी एमटेक झालेली… जावईही उच्च शिक्षित आणि स्पेनमध्ये मल्टिनॅशनल कंपनीत कामाला… पण लग्नात ना ढोलांचा दणदणाट होता, ना ताशांचा खणखणाट… अत्यंत साध्या पद्धतीने राज्याचे मातब्बर नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या लेकीचा विवाह सोहळा पार पडला. मोजक्याच आप्तेष्टांच्या सान्निध्यात नोंदणी पद्धतीने विवाह सोहळा झाला. लेकीच्या गळ्यात वरमाला पडल्या अन् लेकीशी ताटातूट होणार या भावनेने जितेंद्र आव्हाडही भावूक झाले होते. यावेळी ते डोळ्यातील अश्रू लपवू शकले नाहीत.
नताशा ही जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. एलेन पटेल यांच्याशी तिचा विवाह पार पडला. एलेन आणि नताशा इयत्ता पहिलीपासून एकत्र शिकले आहेत. शाळेतला जोडीदारच तिचा लाईफ पार्टनर झाला आहे. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं आहे. तर एलेनचं शिक्षण एमएस अँड फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. एलेन स्पेनमधल्या एला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं असून मतदारसंघातल्या लोकांसाठी लग्नाचं रिसेप्शन ठेवलं जाणार आहे.
आव्हाड यांच्या मुलीचं आज साध्या पद्धतीनं रजिस्ट्रर मॅरेज पार पडलं. आव्हाड यांची मुलगी नताशा ही एलन पटेल यांच्याशी विवाहबद्ध झाली आहे. एकीकडे राजकीय नेत्यांच्या मुलांचे-मुलींचे शाही विवाह सोहळे होत असताना आव्हाड यांच्या लेकीचा विवाह मोजक्यात नातेवाईकांच्या उपस्थित पार पडल्याने हा सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. हा विवाह अगदी साध्या पद्धतीनं घरातल्या घरात पार पडला. लग्नसोहळ्यासाठी होणारा शाही थाट दूर करत आव्हाड यांच्या कन्येचं शुभमंगल अवघ्या 10 ते 15 लोकांमध्ये पार पडलं. हे लग्न पारंपारिक पद्धतीऐवजी नोंदणी पद्धतीनं करण्यात आलं. विवाह प्रमाणपत्रावर वधूवरांनी सही करत कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. मुलीच्या इच्छेप्रमाणं रजिस्टर मॅरेज केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
लग्न म्हटलं की दागदागिने आले. पण या विवाहसोहळ्यात वधू असलेल्या नताशानं कुठलेही दागदागिने घातले नाहीत. जितेंद्र आव्हाड हे कायम पुरोगामी विचार मांडत असतात. तोच वारसा नताशा पुढे घेऊन जाताना दिसत आहे. मुलीचं लग्न साधेपणानं झालं तरी यावेळी आक्रमक जितेंद्र आव्हाड भावूक झालेले पाहायला मिळाले.
संबंधित बातम्या:
अनिल देशमुखांच्या पत्नीला दिलासा, खासगी सचिव पलांडे आणि शिंदेंना मात्र जामीन नाहीच
हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून, 28 डिसेंबरला मुंबईत अंकिताचा विवाहसोहळा