ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. महिलेच्या आरोपांमुळे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तसेच विनयभंगाच्या आरोपांमुळे जितेंद्र आव्हाड व्यथित झाले आहेत. त्यातून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवलाय. भाजप महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या गंभीर आरोपांमुळे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यादेखील आक्रमक झाल्या आहेत. आव्हाडांवरील या आरोपांमुळे ऋता आव्हाड यांनी मोठा निर्णय घेतलाय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपांप्रकरणी ऋता आव्हाड राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे राज्य महिला आयोगाने या संदर्भात कारवाई करावी, या मागणीसाठी ऋता आव्हाड राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलीय.
दुसरीकडे या प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारींची दखल राज्य महिला आयोगाकडूनही घेण्यात आलीय. राज्य महिला आयोग ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवणार आहे. आयोग पोलीस आयुक्तांकडे जितेंद्र आव्हाड यांच्यावरील आरोपांप्रकरणी संबंधित घटनेचा अहवाल मागणार आहे.
रिदा राशिद या महिलेनं राजकीय हेतूपोटी खोटे आरोप केल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे आलीय. या तक्रारीनंतर राज्य महिला आयोग ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने एक व्हिडीओ सादर केलाय. या व्हिडीओत आव्हाड महिलेला गर्दीतून बाजूला सारताना दिसत आहेत. महिलेने या प्रकरणी सादर केलेला व्हिडीओच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय.
आरोपी महिलेने सादर केलेला व्हिडीओ आपण ठाणे-मुंब्र्यात जागोजागी मोठी स्क्रिन लाऊन दाखवणार असल्याचं ऋता आव्हाड यांनी सांगितलंय.विशेष म्हणजे ऋता आव्हाड यांनी आरोप करणाऱ्या महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.