कल्याण (ठाणे) : कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात एका इमारतीत लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर पोलीस, केडीएमसी, वन विभाग आणि इतर पर्यावरण प्रेमी संघटनांना अखेर यश आलंय. विशेष म्हणजे बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या दहा तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं. या दरम्यान बिबट्याने इमारतीत चांगलाच धुमाकूळ घातला. बिबट्याने आज सकाळीच इमारतीत शिरताना तीन जणांवर हल्ला केला. त्यानंतर तो इमारतीत शिरला. त्याला पकडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्नांची पराकष्ठा करण्यात आली. अखेर त्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलं. त्यामुळे परिसरातील नागरिकांनीदेखील सुटकेचा श्वास सोडला.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका इमारतीत बिबट्या शिरल्याची बातमी समोर आली. बिबट्याने सकाळीच श्रीराम अनुग्रह टॉवर या इमारतीत शिरताना तीन जणांवर हल्ला केला. त्यानंतर तो इमारतीत शिरला.
सुरुवातीला तो इमारतीच्या पार्किंगमध्ये होता. त्यानंतर तो थेट इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर पोहोचल्याची बातमी समोर आली. बिबट्याचा इमारतीच्या पहिल्या माळ्यावरचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेष म्हणजे सकाळपासून पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरुय. पण बिबट्या काही हाती लागत नव्हतो. अखेर दहा तासांनंतर त्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला यश आलं.
दुसरीकडे बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी परिसरात तुफान गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी बिबट्याला शोधायचं की गर्दीला आवरायचं? हा प्रश्न निर्माण झाला. पोलीस आपल्यापरिने बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते. काटेमानवली नाक्याहून चिंचपाड्याकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला होता.
श्रीराम अनुग्रह टॉवर या इमारतीत राहणारे राजू पांडे हे सकाळी साडेआठ वाजता आपल्या सहा दिवसांच्या बाळाला ऊन दाखवण्यासाठी इमारतीच्या खाली आले. यावेळी बिबट्यानेही त्यांच्यावर हल्ला केला.
एका हाताने अधू असलेल्या राजू पांडे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या मुलाला आपल्या छातीशी लपून ठेवले आणि मुलाचे जीव वाचवले. बिबट्याने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि खांद्यावर हल्ला केला.
कल्याण पूर्वेत चिंचपाडा रोडवर असणा-या एका इमारतीत गुरूवार सकाळपासून बिबट्या शिरलाय. बिबट्याने काही जणांना जखमी केलंय. प्रशासनाकडून गेल्या आठ तासांपासून बिबट्याला पकडण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू pic.twitter.com/KbM09plifq
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) November 24, 2022
यावेळेस राजू पांडे यांचा भाऊ पाठीमागून जोरात बिबट्याच्या दिशेने धावत आला, लोकांची गर्दी बघत बिबट्याने बिल्डिंगमध्ये धाव घेतली.
बिबट्याच्या या हल्ल्यात राजू पांडे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उल्हासनगरमधील शिवम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्यावर 40 टाके पडले आहेत. बाळ देखील सुखरूप असून ते त्याच्या आजी जवळ आहे.
विविध संघटना, वन विभागाच्या टीम एकत्र येऊन बिबट्याला पकडण्याची योजना आखण्यात आली. इमारतीत फटाके फोडून लपलेल्या बिबट्याचा शोध सुरू झाला. संजय गांधी नॅशनल पार्क रेस्क्यू टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर दोन तासांनी बिबट्याला शोधण्यात यश आलं.