कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे स्थानिक महिला या अतिशय आक्रमक झाल्या आहेत. या घटनेनंतर स्थानिक महिला संतप्त झाल्या असून, महिला आणि लहान मुलींच्या मनात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक महिलांनी आरोपीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “जर सहा महिन्यांनी आरोपी सुटून येतो आणि अशा प्रकारचं कृत्य करतो, आम्ही आमच्या मुलींना बाहेर सोडायचं की नाही? अशी भीती आम्हाला वाटत आहे. त्याचबरोबर आम्ही इकडे राहायचं की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. घरातून बाहेर मुलांना पाठवायला भीती वाटत आहे”, असं स्थानिक महिला म्हणाल्या आहेत.
“तो दर तीन ते चार महिन्यानंतर सुटून येतो. त्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हे पाहिलं पाहिजे. आम्हालाच कळत नाही तो कसा सुटून येतो? आरोपीचा एन्काऊंटर करा किंवा त्याला फाशी द्या, हीच आमची मागणी आहे. आरोपीची दहशत सगळीकडे आहे. आता पण भीती वाटते, त्याचे मित्र येऊन आम्हाला मारतील का? अशी भीती आमच्या मनात आहे. पोलीस त्याला पैसे घेऊन सोडतात. त्याला पोलिसांच्या ताब्यात नाही, सर्वसाधारण लोकांच्या हातात द्या. आम्हाला काय करायचे ते करू”, अशा शब्दांत महिलांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “पीडितेच्या कुटुंबियांना आम्ही भेटलो. तिची आई रडत आहे. त्यांच्या मोठा आक्रोश मनात आहे. घरात मुलीला आवाज देत आहे. तिचा आक्रोश बघवत नाही. तिचं एकच म्हणणं आहे की, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले आहे की, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल. राजकीय दबाव असल्याचं जे कोणी सांगतात त्याप्रमाणे चौकशी व्हावी. मात्र एका मुलीची हत्या झाली आहे. या वेळेला राजकारण करू नये”, अशी प्रतिक्रिया सुलभा गायकवाड यांनी दिली.