ठाणे : आठवड्याभरात दुसऱ्यांदा थोडक्यात मोठा रेल्वे अपघात (Railway Accident) अगदी होता होता टळलाय. कल्याण जवळ रेल्वे स्थानकात (Kalyan Railway Station) एका रेल्वे ट्रॅकला फ्रॅक्चर झाल्याचं निदर्शनास आलं होतं. ही बाब लाईनमनने पाहिली. त्याने राखलेल्या प्रसंगावनधानामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळालय. सकाळी साडे सहा ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास कल्याण जवळील पत्रिपुलाजवळ (Kalyan Patripool) रेल्वे ट्रॅक फ्रॅक्चर झाला होता. ही बाब कळल्यानंतर लाईनमनने तातडीने त्याची माहिती वरिष्ठांना दिली.
रेल्वे ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. रेल्वे प्रशासनाने या ट्रॅकवरुन जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तत्काळ थांबवली. त्यामुळे मोठा रेल्वे अपघात टळला.
या गाड्या थांबवण्यात आल्याने सकाळी चाकरमन्यांचे हाल झाले. कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे वेळापत्रक सकाळी कोलमडलं होतं. यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळच्या वेळीच लोकल सेवेचा खोळंबा झाल्यामुळे एकच गर्दी रेल्वे स्थानकात उडाली होती. नेमकं काय झालंय, हे कळायलाही काही मार्ग नसल्यानं लोकांनाही मनस्तापाला सामोरं जावं लागलं.
एकीकडे लोकल स्थानकात उशिरा येत असल्यानं दुसरीकडे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी वाढतच चालली असल्याचंही दिसून आलंय. घडलेल्या प्रकाराबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याकारणाने रेल्वे प्रवाशांनी मात्र संताप व्यक्त केला. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या खोळंब्यामुळे प्रवाशांना नाहत त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईत भायखळा जवळ कल्याणला जायला निघालेल्या फास्ट लोकलचा अपघात मोटरमनच्या प्रसंगावनधानामुळे टळला होता. एका अज्ञात व्यक्तीने लोकल ट्रॅकवर लोखंडी ड्रम टाकून ठेवला होता. या ड्रममध्ये दगड भरण्यात आले होते. या ड्रमची आणि लोकलची धडकही झाली होती. पण लोकलच्या मोटरमनने वेग कमी करुन लगेचच ब्रेक लावल्याने थोडक्यात निभावलं होतं.