आनंद दिघे यांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत. त्यांच्या विचारांवर आधारित आपण राजकारण आणि समाजकारण करतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार म्हणताना दिसतात. मात्र त्याच आनंद दिघे यांच्या कुटुंबातून शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात दिघे कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. कल्याणमधून आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघेंना यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
कल्याणमधून केदार दिघे यांना ठाकरे गट उमेदवारी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर केदार दिघे यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संपर्क केला. तेव्हा त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मला आपल्याच माध्यमातून कळतं आहे की, मला तिकीट दिली जाण्याची चर्चा आहे म्हणून… पण आजपर्यंत माझी पक्षप्रमुखांशी कोणतीही वैयक्तिकरित्या चर्चा झालेली नाही. त्यामुळे यावर बोलणं योग्य ठरणार नाही, असं केदार दिघे म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी दिली. तर याबाबत तुम्ही विचार करणार का? तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा केदार दिघे यांनी आपलं मत मांडलं. शिवसेना पक्षात आधीपासूनची परंपरा आहे की पक्षातील वरिष्ठांचा आदेश आला की त्याचं पालन केलं जातं. त्यामुळे मला जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर मी त्याचं पालन करेन. ही निवडणूक लढण्यास कोणतीही हरकत नसेल. मला तसा कोणताही निरोप अद्याप आलेला नाही. पण जर तसा आदेश आला तर नक्कीच त्याचं पालन करेन, असं केदार दिघे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना विजयापासून रोखण्यासाठी ठाकरे गटाने मास्टर प्लॅन आखल्याचं दिसतं आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. केदार दिघे हे आनंद दिघेंचे सख्खे पुतणे आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ठाणे- कल्याण या भागात आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय केदार दिघे यांचाही सर्वसामान्यांवर प्रभाव आहे. त्यामुळे केदार दिघे यांना उमेदवारी दिली तर ही लढत अधिक चुरशीची होऊ शकते.