डोंबिवली : डोंबिवलीतील दत्तनगर परिसरातील बेकायदा पाच मजली इमारतीवर केडीएमसीने अखेर पाडकामाची कारवाई सुरु केली. या इमारतीत राहण्यास आलेले 40 कुटुंबीय बेघर झाल्याने केडीएमसी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ज्यावेळी ही इमारत बांधली जात होती. त्यावेळी महापालिकेचे अधिकारी काय झोपले होते का असा संतप्त सवाल बेघर होणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.
डोंबिवली पूर्व भागातील श्री दत्त कृपा ही पाच मजली इमारत ही वादग्रस्त ठरली होती. बेकायदा बांधकाम असल्याचा ठपका ठेवत महापालिकेने या इमारतीला बेकायदा घोषित केले. ही इमारत वादग्रस्त राहिली आहे. इमारतीचे काम सुरु होताच काही महिन्यानंतर या इमारतीवर कारवाई झाली. मात्र ती कारवाई थांबवत ही इमारत पुन्हा बांधण्यास सुरुवात झाली आता ही इमारत तयार झाल्यावर 40 कुटुंबे त्या ठिकाणी राहण्यासाठी आले असता केडीएमसीने कारवाई सुरु केली. चार तास पोलीस आणि इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये गोंधळ सुरु होता. पोलिसांनी बळजबरीने इमारत रिकामी केली. त्यानंतर तोडक कारवाई सुरु झाली. रहिवाशांनी यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला.
स्थानिक आमदार आणि नगरसेवकामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. बेघर झालो असा आरोप करण्यात आला. महिला रहिवासी रेखा कांबळे यांनी सांगितले की, 1970 सालापासून या जागेवर आमची इमारत होती. इमारत धोकादायक झाल्याने ती पाडण्यात आली. आम्ही चाळीस कुटुंबिय मिळून ही इमारत बांधली आहे. आम्हाला जबरदस्तीने बाहेर काढले. कोणतीही नोटीस आणि पूर्व सूचना न देता ही कारवाई केली आहे. यासंदर्भात प्रभाग अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी सांगितले, सध्या कारवाई सुरु आहे. संपूर्ण कारवाई झाल्यावर आम्ही याविषयीची माहिती देऊ. मात्र इमारतीचे काम सुरु होते तेव्हा अधिकारी कुठे होते याचे उत्तर देणे टाळले. (KDMC hammers on illegal building in Dombivali, 40 families homeless)
इतर बातम्या
Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट केसमधील साक्षीदाराने साक्ष बदलली, सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा