राज्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केली. नंतर पावसाने दडी मारली. काळे ढग रोज आकाश व्यापून टाकतात. पण पाऊस काही पडत नाही, अशी आवस्था आहे. आता काही जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक शहरात तुफान पाऊस सुरु आहे. पालघरमध्ये तर पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प
हा पूल पाण्याखाली गेल्याने पालघर आणि मनोर वाडा यांच्यामधील संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प पडली आहे. तर पश्चिम बोईसर-उमरोली स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रकच्या अप आणि डाऊन दोन्ही लाईनमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे ट्रेन संथगतीने जात आहे. त्यामुळे रेल्वे 25-30 मिनिट उशीराने धावत आहेत.
पावसाने आणली जान
मुंबई, ठाणे आणि भिवंडी परिसरात सध्या वातावरण आल्हाददायक झाले आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने भिवंडी शहरातील अनेक भागात पाणी साचले. भिवंडीतील अनेक भाग जलमग्न झाले आहेत. या पावसामुळे मुंबईतील वातावरण आल्हाददायक आणि थंड झाले आहे. जुहू बीचवर मुंबईकरांना आणि पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. या बीचवर लोकांची वर्दळ वाढली आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.
हवामान खात्यानुसार मुंबईत 6 दिवसांपर्यंत पावसाचा अलर्ट आहे. आज आणि उद्या म्हणजे 20 आणि 21 जून रोजी मुंबईत पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर 22 ते 25 जून पर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे. या दरम्यान कमाल तापमान 31-32 सेल्सियस तर किमान तापमान 26-23 डिग्री सेल्सियस असे असेल.
कल्याण डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस
कल्याण डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची यामुळे पोल खोल झाली आहे. कल्याण पूर्वेकडील पीसवली गावातील श्री कॉलनी ज्योतिर्लिंग कॉलनी, धनश्री कॉलनी जलमय झाली आहे. नाला चुकीच्या पद्धतीने बांधल्याने जन्म परिस्थिती झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.