अंबरनाथ : अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तिसऱ्या लाटेत ज्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
अंबरनाथ शहरात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात मिळूनही अंबरनाथ शहराची रुग्णसंख्या दोन आकडीच होती. मात्र नव्या वर्षाच्या पहिल्या पाच दिवसात अंबरनाथ शहरात 250 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातली परिस्थिती निश्चितच चिंताजनक बनली आहे.
सध्या शहरातल्या प्रत्येक दवाखान्यासमोर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक घरात सध्या सर्दी, ताप, अंगदुखीचे रुग्ण आढळत आहेत. हे सगळं व्हायरल इन्फेक्शन असल्याचं जरी सांगितलं जात असलं, तरी या सगळ्यांची टेस्ट केली, तर अर्ध्यापेक्षा जास्त जण कोरोना पॉझिटिव्ह येतील, अशी भीती स्वतः डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.
याचं कारण म्हणजे तिसऱ्या लाटेतला हा कोरोना आधीच्या दोन लाटेतल्या कोरोनापेक्षा सौम्य असल्याचं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवलं आहे. या नव्या कोरोनाचा प्रसार अतिशय वेगाने होत आहे, मात्र त्याची तीव्रता अतिशय कमी असून श्वसन यंत्रणेवरही तो आघात करत नसल्याचं समोर आलं आहे. फक्त दोन ते तीन दिवस ताप, सर्दी, खोकला असा त्रास रुग्णांना जाणवत असून त्यानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. मात्र याच रुग्णांची टेस्ट केली तर ती 100 टक्के पॉझिटिव्ह येईल, असंही मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
कोरोनाची ही तिसरी लाट येण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरकडे सर्दी तापाचे दिवसाला 50 रुग्ण येत असतील, तर आता ही संख्या 100 वर गेली आहे. त्यामुळे या नव्या कोरोनाचा प्रसार किती वेगाने होतोय, याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल. मात्र यातली दिलासादायक बाब म्हणजे हा नवा कोरोना धोकादायक नसून तो घरच्या घरीच बरा सुद्धा होण्यासारखा आहे. त्यामुळे डॉक्टर्स सुद्धा टेस्ट करण्याच्या फंदात न पडता आधी रुग्णाला बरं करण्याला प्राधान्य देत आहेत.
दुसरीकडे या लाटेमुळे मेडिकल चालकांकडे डोलो गोळीची मागणी चांगलीच वाढली आहे. ताप आणि अंगदुखीवर डोलो गोळी प्रभावी असल्यानं अनेक जण घरच्या घरीच डोलो आणि अझिथ्रामायसिन घेऊन बरे सुद्धा होत आहेत. तर मागील दोन लाटांप्रमाणे व्हिटॅमिनच्या गोळ्यांना मात्र अद्याप मागणी नसल्याचं मेडिकल चालक सांगतात.
दरम्यान शहरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिका प्रशासन सुद्धा सतर्क झालं आहे. नगरपालिकेकडून चालवलं जाणारं डेन्टल कॉलेज कोव्हीड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं असून पालिकेकडून 40 जणांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टीम तयार करण्यात आलीये. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला, की त्याच्या संपर्कातल्या 10 जणांची आता पालिकेकडून टेस्ट केली जाणार आहे. छाया रुग्णालयात सध्या स्वॅब टेस्टिंग केलं जात असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन अंबरनाथ नगरपालिकेकडून करण्यात आलंय.
शहरात कोरोनाचा हा वाढता प्रसार पाहता नागरिकांनी सुद्धा आता स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नवीन कोरोना घातक नसला, तरी वेगवान नक्कीच आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग हे तीन नियम काटेकोरपणे पाळले, तरी आपला कोरोनापासून बचाव नक्कीच होऊ शकेल.
संबंधित बातम्या :
Nagpur | स्टेराईडचा अतिवापर धोकादायक! काय म्हणतात, अस्थिरोगतज्ज्ञ
महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! रुग्णसंख्येचा नवा उच्चांक! कोरोना रुग्णवाढ 36000च्याही पार