बदलापूर : बदलापूर शहरात गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रासायनिक वायु प्रदूषण सुरु होतं. या प्रकरणी अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणकारी कंपनी शोधून काढली. या कंपनीला थेट क्लोजर नोटीस बजावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
बदलापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून संध्याकाळच्या वेळी अचानकपणे उग्र रासायनिक दर्प पसरत होता. सोमवार आणि मंगळवारी या गॅस उत्सर्जनाचा बदलापूरकरांना मोठा त्रास झाला. त्यामुळे एमआयडीसीतील एखाद्या कंपनीतून गॅस उत्सर्जन केलं जात असल्याचा संशय व्यक्त होता.
बदलापूर एमआयडीसीत सर्च ऑपरेशन
या प्रकरणी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी संध्याकाळी बदलापूर एमआयडीसीत सर्च ऑपरेशन राबवलं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे आणि उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे हे स्वतः या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.
कंपनीतून गॅस गळती
यावेळी बदलापूर एमआयडीसीतील बीएसएनएलच्या बाजूला असलेल्या ए -61 क्रमांकाच्या एस्केल केमिकल्स या कंपनीतून हा उग्र दर्प येत असल्याचं आढळल्यानं अधिकाऱ्यांनी या कंपनीत जाऊन तपासणी केली. यावेळी याच कंपनीतून गॅस गळती सुरू असल्याचं स्पष्ट झालं.
बदलापुरात गॅसचा दर्प कसा पसरला?
पूर्वी स्क्वेअर केमिकल्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीत मरकॅप्टन नावाच्या सॉल्व्हंटचं डिस्टीलेशन केलं जात होतं. मात्र हे सॉल्व्हंट हिट करताना त्यातून निघणारे पार्टीकल्स थेट हवेत मिसळत असल्यानं त्यातून बदलापुरात गॅसचा दर्प पसरल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे यांनी दिली.
कंपनीला तातडीने क्लोजर नोटीस
ही बाब समोर आल्यानंतर या कंपनीला तातडीने क्लोजर नोटीस, म्हणजे उत्पादन थांबवण्याची नोटीस देण्यात आली. या प्रकरणी एमपीसीबी अधिकारी सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून त्यामुळे त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. बदलापूर फायर ब्रिगेडने या संपूर्ण सर्च ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली.
बदलापुरात याआधीही गॅस गळती
बदलापूरच्या एमआयडीसीतून यापूर्वीही तीन जून रोजी गॅस गळती झाली होती. त्यावेळी बदलापूर एमआयडीसीतल्या नोबेल इंटरमिडीएट्स या कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तरीही बदलापूर एमआयडीसीतून रासायनिक प्रदूषणाचे प्रकार सुरूच असल्यामुळे कंपन्यांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO : पावसाचं पाणी अतिशय शुद्ध, मग हा नाला हिरवागार कसा? डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार