बदलापूर (ठाणे) : कोरोना काळात अनेकांना जवळची माणसं गमावली. काही घरांमध्ये घराच्या कर्त्या पुरुषाचं निधन झालं. या संकटात घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर मायेचं प्रेमळ हास्य निर्माण व्हावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे देखील सहभागी झाले. त्यांनी कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या महिला आणि भगिनींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली, तर त्यासाठी राज्य सरकारची पूर्णपणे तयारी आहे. दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या दीडपट संख्येने बेड, ऑक्सिजन, औषधं आणि इंजेक्शन यांची तयारी राज्य सरकारने ठेवल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं. बदलापूर येथे झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नागरिक त्याचप्रमाणे शासनदेखील काहीसं गाफील होतं. मात्र दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही महाभयंकर ठरली. ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्सची कमतरता, रेमडेसिविर सारख्या इंजेक्शनचा तुटवडा, त्यानंतर झालेला काळाबाजार या सगळ्या परिस्थितीमुळे काही काळ यंत्रणासुद्धा हतबल ठरली होती. त्यातच आता तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असून या लाटेत राज्य सरकारची काय तयारी असेल? असा प्रश्न राजेंद्र शिंगणे यांना विचारण्यात आला. त्यावर शिंगणे यांनी उत्तर दिलं.
दुसऱ्या लाटेत जितके रुग्ण होते, त्याच्या दीडपट म्हणजेच जवळपास 12 ते 13 लाख रुग्णांच्या दृष्टीने तिसऱ्या लाटेसाठी तयारी करण्याच्या सूचना केंद्र सरकार आणि स्टेट टास्क फोर्सनं दिल्या आहेत. त्यानुसार तितक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन, बेड्स, औषधं आणि रेमडेसिविर सारखी इंजेक्शन्स सज्ज ठेवल्याचं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं. ही सगळी तयारी जवळपास 90 टक्के पूर्ण झाल्याचंही ते म्हणाले.
राजेंद्र शिंगणे हे बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाला आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या महिला आणि भगिनींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्यासह महिला वर्गाने मोठी उपस्थिती लावली होती.
हेही वाचा : अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीने काढली सिलेंडरची अंत्ययात्रा, इंधन दरवाढीविरोधात उद्विग्नता व्यक्त