ठाणे : राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरू केला आहे. त्यासाठी लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना पास देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमधील महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसी घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होतेय. आज (11 ऑगस्ट) तर सकाळच्या सुमारास कल्याणच्या आचार्य अत्रे रंग मंदिराबाहेर जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांग गेली.
नागरिकांना 9 वाजता येऊनही टोकन देण्यात आलं नव्हतं. या रांगेत तरुण-तरुणींसह वृद्ध नागरिक देखील उभे होते. काही जणांनी तर काल (10 ऑगस्ट) रात्री 11 वाजल्यापासून रांग लावली होती, तर काही जणांनी सकाळी पहाटे साडेतीन चार वाजता या ठिकाणी रांग लावली होती. त्यामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या नियोजनहीन कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर वसई विरार नालासोपाऱ्यात लसीकरण केंद्रावर आदल्या दिवशीच्या दुपारी 3 वाजल्यापासूनच रांगा लागायला सुरुवात झाली. वसई विरार महापालिकेला शासनाकडून 4 हजार 850 कोव्हिशिल्डच्या लस उपलब्ध झाल्याने 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 17 लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस मिळणार आहे. त्यासाठी दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्रभर महिला, पुरुष रांगेत बसले आहेत.
Mismanagement of Corona Vaccine center by KDMC 1 Km queue