ठाणे : अंबरनाथमध्ये (Ambernath) कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांच्या भावाने पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय. पालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून कारवाई केली जात असताना हा प्रकार घडला. या प्रकाराचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर आमदाराच्या भावाकडून असं कृत्य कसं घडू शकतं? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अनधिकृत बांधकामावरील कारवाईदरम्यान संबंधित प्रकार घडला.
उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर बांधकाम सुरू होतं. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली. पण याचवेळी आमदारांच्या भावाची अरेरावी बघायला मिळाली. विशेष म्हणजे यावेळी कार्यकर्त्यांकडून पालिका कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की झाल्याचं देखील समोर आलंय.
अंबरनाथ पालिकेच्या हद्दीतील नवीन वडवली तलाव परिसरात शिवमंदिरासमोर पालिकेचा उद्यानासाठी आरक्षित भूखंड आहे. या भूखंडावर गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम केलं जात होतं. याच भूखंडावर स्थानिक भूमाफियांकडून अनधिकृतपणे काही टपऱ्या सुद्धा उभारण्यात आल्या आहेत.
याबाबत अंबरनाथ पालिकेकडे तक्रारी आल्यानंतर आज सकाळच्या सुमारास अंबरनाथ पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक या ठिकाणी दाखल झालं आणि त्यांनी अनधिकृत बांधकामासाठी उभारलेले तीन फाउंडेशन तोडायला सुरुवात केली.
यावेळी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे लहान भाऊ तुकाराम म्हात्रे हे तिथे आले आणि त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत तिथून पिटाळून लावलं. तर त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पालिका कर्मचाऱ्यांशी झटापटी करत त्यांना धक्काबुक्की केली.
हा सगळा प्रकार पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल कॅमेरात चित्रित केला. यानंतर आता याप्रकरणी आमदारांच्या भावावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई होते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्य शासनाच्या जागेवर किंवा राज्य शासनाने राखीव ठेवलेल्या जागेवर कुणी बांधकाम केलं त्या विरोधात महापालिकांकडून कारवाई केली जाते. हा खरंतर महापालिकांचा अधिकारी आहे. पालिका प्रशासन अशा अनधिकृत बांधकामांविरोधात कडक कारवाई करु शकते. याशिवाय या कारवाईला जो विरोध करेल त्या व्यक्तीवर कारवाई देखील करु शकते. कारण महापालिकेला तसे अधिकार आहेत.
राज्यभरातील विविध महापालिकांकडून आतापर्यंत अतिक्रमण विरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे अंबरनाथ पालिकेने केलेली कारवाई महत्त्वाची आहे. पण अशी कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केला जात असल्याचा प्रकार धक्कादायक असल्याची चर्चा सध्या सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे.