कल्याण (ठाणे) : कल्याणच्या वसंत व्हॅली परिसरात 2015 साली गाजावाजा करीत केडीएमटीकडून माननीय बाळासाहेब ठाकरे आगार तयार करण्यात आले. सहा वर्षानंतर या आगाराची दुरावस्था झाली आहे. या आगारात भंगार बस गाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. या आगाराला गवताने वेधले आहे. या आगाराला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी पुढाकार घेणारे माजी परिवहन सदस्य इरफान शेख यांनी आगाराच्या दुरावस्थेबाबत व्यथा मांडली आहे. मला याची खंत आहे की, इतक्या मोठ्या व्यक्तीचे नाव दिले त्या आगाराची ही अवस्था झाली आहे, असं ते म्हणाले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने 2015 साली कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात एक आगार तयार केले. या आगाराला माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. या आगारातून थेट नवी मुंबईला एसी व्होल्वा बस चालविल्या जात होत्या. आता या आगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे. आगारात भंगार बसेस उभ्या करण्यात आल्या आहे. शहरातील बेवारस वाहने, भंगार वाहने देखील याठिकाणीच डम्प करण्यात आली आहे.
आगाराच्या आसपास आणि आतील भागात गवत आणि झाडे वाढली आहे. या आगाराला गेटसुद्धा नाही. या आगाराला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी तत्कालीन मनसेचे परिवहन सदस्य आणि सध्या मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पुढाकार घेतला होता. या डेपोला बाळासाहेबांचे नाव देण्यात आले. त्यांनी आज या आगाराची अवस्था पाहून खंत व्यक्त केली आहे.
इरफान शेख यांनी याबाबच फेसबुवर पोस्ट टाकून खंत व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवलीत 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या आगाराला बाळासाहेबांचे नाव दिले आहे. तरी देखील परिवहन व्यवस्थापनाकडून या आगाराकडे दुर्लक्ष झाले असल्याने ही अवस्था झाली आहे, असं ते म्हणाले आहेत. या प्रकरणात केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे.
याबाबत शिवसेनेचे उपशहर प्रमुख रवी पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. “आमचे अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले आहे. कोरोना संकट असल्याने या आगाराच्या देखभालीवर दुर्लक्ष झाले आहे. येणाऱ्या आठ दिवसात आगाराची देखभाल केली जाईल”, अशी भूमिका रवी पाटील यांनी मांडली (MNS allegation on Shivsena over Kalyan Balasaheb Thackeray depot).
हेही वाचा : माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह, पंकजा मुंडेंचा थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा?