ठाणे : मनसेचा आज 17वा वर्धापन दिन सोहळा आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यानिमित्ताने मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला, कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक, शिवसेनेचं निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह काढून घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या रडारवर आज कोण कोण असणार? याचीही सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने मनसेकडून सभेचे काही टीझर रिलीज करण्यात आले आहेत. त्यातून राज ठाकरे काय बोलणार याची दिशा स्पष्ट होताना दिसत आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर पेजवर हे टीझर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यात राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यापूर्वीची आणि मनसे स्थापन करण्यापर्यंतची त्यांची मानसिकता कशी होती, याची थोडक्यात माहिती दिली आहे.
मनसेच्या पहिल्या टीझरमध्ये राज ठाकरे यांचा हात जोडलेला फोटो आहे. या फोटोत राज यांच्या कपाळावर टिळा दिसत आहे. या टीझरमध्ये राज ठाकरे यांचं निवेदन सुरू होतं. राज ठाकरे यांचं जसजसं निवेदन पुढे सरकतं तसं तसे राज ठाकरे यांचे फोटो दिसतात. शिवसेना सोडल्यानंतरचे आणि मनसे स्थापन झाल्यानंतरचे हे फोटो आहेत. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानी आले होते. तिथेच रस्त्यावर त्यांनी हातात माईक घेऊन लोकांशी संवाद साधला होता.
ते फोटो या टीझरमध्ये आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांचे सभेतील फोटो, पत्रकार परिषदेतील फोटो आणि आंदोलनातील फोटो या टीझरमध्ये दिसतात. 1 मिनिट 12 सेकंदाचा हा टीझर आहे. टीझरच्या शेवटी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया, असं म्हटलंय. तर टीझर ट्विट करताना वर … महाराष्ट्र सैनिकांच्या निर्व्याज निष्ठेसमोर नतमस्तक! अशी पोस्ट करण्यात आली आहे.
माझ्या सर्व मनसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र…
जेव्हा आपण महाराष्ट्र निर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा खरंच सांगतो. मनात एक धाकधूक होती. मी एका ध्येयाने बाहेर पडून महाराष्ट्रासाठी नवं असं काही तरी उभं करायला निघालो होतो. पण तुम्ही हे कसं स्वीकाराल? लोकं कसं स्वीकारतील मनात ही एक धाकधूक होती. पण 19 मार्च 2006च्या पक्षस्थापनेनंतरच्या शिवतीर्थावरच्या सभेत मी व्यासपीठावरती पाऊल ठेवलं.
समोर पसरलेला अलोट जनसमुदाय पाहिला. आणि मनातील शंका दूर झाली. माझ्यासह कोणालाही हेवा वाटेल अशी मनसैनिकांची अचाट शक्ती होती. ती कितीही खाचखळगे आले अडचणींचा डोंगर उभा राहिला, तरीही माझ्यासोबत आहे. याच्या इतकी आनंदाची बाब ती काय?
सदैव आपला नम्र राज ठाकरे… जय हिंद जय महाराष्ट्र
… महाराष्ट्र सैनिकांच्या निर्व्याज निष्ठेसमोर नतमस्तक ! ???#मनसे_वर्धापनदिन pic.twitter.com/aCWU60YbfW
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2023
दुसऱ्या टीझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. त्यानंतर गाणं सुरू होतं. मनसे… रारा रारा रारारा… असं गाणं सुरू होतं. त्यानंतर राज ठाकरे सभेला संबोधित करताना दिसत आहेत. नंतर मनसेचं निवडणूक चिन्ह इंजिन दिसतं. त्यानंतर नव्या दमाने, नव्या आयुधांसह नवनिर्माण सज्ज असा मजकूर येतो. त्यानंतर कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि स्थळाची माहिती येते. वर्धापण दिन सोहळा. 9 मार्च, संध्याकाळी 6 वाजता, गडकरी रंगायतन ठाणे.