कल्याण : राज्यात मनसे (MNS) आणि भाजपची (BJP) युती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात आपण आगामी काळात सर्व महापालिका निवडणुका जिंकू आणि सत्तेतच राहू असं विधान केलं. त्यामुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे या चर्चांना आणखी खतपाणी घालणारी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या बॅनरवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा फोटो झळकला आहे. त्यामुळे शहरात मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलंय.
भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी याबाबतचं बॅनर लावलं आहे. या बॅनरमध्ये त्यांनी भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कल्याण ग्रामीण मतदारसंघाकील भोपर-देसलेपाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 20 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल रवींद्र चव्हाण आणि राजू पाटील यांचे या बॅनरमधून आभार मानण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे ठाण्यात दोन दिवसांपूर्वी मनसेचा 17 वा वर्धापनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातून राज ठाकरेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. माझ्या वाट्याला गेले आणि मुख्यमंत्रिपदावरुनच गेले असं राज ठाकरे म्हणाले. तसेच आगामी काळात मनसे सत्तेत असेल हे आपल्याला माहिती असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे भाजपसोबत युतीचे संकेत तर नाही ना? अशी चर्चा सुरु झाली.
राज ठाकरेंनी मनसेच्या 17 व्या वर्धापन दिनाला सत्तेत येण्याबद्दल सूचक विधान केलं होतं. आगामी काळात मनसे सत्तेत राहणार, हे आपल्याला माहिती आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे भाजपसोबत युतीचे संकेत तर नाही ना ? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय. दरम्यान, अयोध्या दौऱ्याला झालेल्या विरोधावरुनही राज ठाकरेंनी भाष्य केलं होतं. हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनीच, दौऱ्याला विरोध केला, असं राज ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांवरुन, आंदोलनं छेडलं होतं. पण भोंग्यांचा विषय अजून संपलेला नाही, याची झलक राज ठाकरेंनी ठाण्यातून दाखवली. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेंवर काही दिवसांआधीच हल्ला झाला होता. त्यावरुनही राज ठाकरेंनी हल्लेखोरांना इशारा दिलाय. येत्या 22 तारखेला गुढीपाडव्याला मनसेचा शिवतीर्थावर मेळावा होणार आहे. याच मेळाव्यात समाचार घेणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हणालेत. पण त्याआधी छोटा टिझर त्यांनी ठाण्यातून दाखवलाय.