मागे घशात हात घालून दात काढले, आता एकमेकांचे कपडे फाडतायत; सेना-भाजपच्या वादावर मनसेचा हल्लाबोल

| Updated on: Feb 27, 2022 | 2:29 PM

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू असून बॅनर युद्धही सुरू आहे. आता या वादात मनसेनेही उडी घेतली आहे.

मागे घशात हात घालून दात काढले, आता एकमेकांचे कपडे फाडतायत; सेना-भाजपच्या वादावर मनसेचा हल्लाबोल
मनसेने मराठी भाषा दिनानिमित्ताने डोंबिवलीत 'एक दौड वीर जवानांसाठी'चं आयोजन केलं होतं. त्यातील स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मान करताना मनसेचे आमदार राजू पाटील.
Follow us on

कल्याण: महापालिका निवडणुकीच्या (kdmc) पार्श्वभूमीवर शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये ( bjp) चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू असून बॅनर युद्धही सुरू आहे. आता या वादात मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना-भाजपवर चांगलाच हल्ला चढवला आहे. मागे घशात हात घालून दात काढले. आता एकमेकांचे कपडे फाडतायत. शिवसेना-भाजपने शहरासाठी काही केलं नाही. निवडणुका पाहून मतदारांना आकर्षित करण्यासाठी भांडत आहेत. मात्र लोक सुज्ञ आहेत. मतदार यावेळेस विचार करतील, असं मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. राजू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता पाटील यांच्या टीकेला शिवसेना-भाजप काय उत्तर देते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.

आज मराठी भाषा दिनानिमित्ताने मनसेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डोंबिवली मनसे शहर शाखेतर्फे जवानांसाठी एका दौडचे आयोजन केले होते. गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते डोंबिवली अशी 65 किलोमीटरची धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या धावण्याच्या स्पर्धेत ठाणे रायगड जिल्ह्यातील खेळाडू, डॉक्टर सहभागी झाले होते. स्पर्धकांनी रात्री 12 वाजता गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथून धावायला सुरवात केली. डोंबिवली येथे सकाळी 9 ला पोहोचले. महिला व पुरुष मिळून 100 जण स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यातून मिळणारा निधी हा जवानांना मदतीसाठी दिला जाणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते धावपटूंचा सन्मान करण्यात आला .

त्यानंतर राजू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं. तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. प्रत्येक निवडणुकीच्या आसपास असंच होतं. मागच्या वेळेस घशात हात घालून दात काढत होते. आता एकमेकांचे कपडे फाडत आहेत. खरं पाहिलं तर दोघेही सपशेल अपयशी ठरले आहेत. कल्याण-डोंबिवली या दोन शहरांसाठी या दोन्ही पक्षांनी काहीच केलं नाही. आता निवडणुका पाहून लोकांना आकर्षित करण्यासाठी भांडत आहेत. मात्र लोक सुज्ञ आहेत या ते वेळेस विचार करतील, असं असे राजू पाटील यांनी म्हणाले.

चांगल्या मुहूर्तावर निर्णय

मनविसे अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती केल्याबद्दल मी राज साहेबांचं आणि अमित ठाकरे या दोघांचा अभिनंदन करतो. गेल्या दोन वर्षापासून आम्ही मागणी करत होतो. चांगल्या मुहूर्तावर साहेबांनी हा निर्णय घेतला, असं ते म्हणाले.

स्वखर्चातून काँक्रीट रस्ता

डोंबिवली पूर्वेतील लोढा हेरिटेज परिसरात समाजसेवक संदीप माळी यांच्या प्रयत्नाने स्वखर्चातून रस्त्याचे काँक्रिटिकरण करण्यात आले आहे. या रस्त्याचे लोकार्पण राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम महापालिकेने केले पाहिजे. मात्र महापालिकेकडून कामं केली जात नाहीत म्हणून स्वखर्चातून संदीप माळी यांनी हे काम केले आहे. संदीप माळीकडून काही शिकलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

अमित ठाकरेंच्या खांद्यावर ‘मनसे’ची मोठी जबाबदारी; राज यांनी साधला मराठी भाषा गौरव दिनाचा अमृतयोग!

मीडियात राहण्यासाठी काहींची केविलवाणी धडपड, वरुण सरदेसाई केडीएमसीच्या रणमैदानात, थेट रवींद्र चव्हाणांवरच हल्लाबोल

पळवून आणलेल्या मुलीसाठी भांडले, एकाने दुसऱ्याला यमसदनी धाडले; कल्याणमधील धक्कादायक घटना