मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कारण पावसाळ्यानंतर राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. यापैकी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. कारण मुंबई महापालिका ज्यांच्या हातात त्यांचं मुंबईवर वर्चस्व असतं, असं मानलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. पण आगामी निवडणुकीत भाजपला महापालिकेत सत्ता मिळवायची आहे. यासाठी भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार अशी चर्चा होती. पण सध्या घडामोडी काहीतरी वेगळ्याच घडत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित होताना दिसत आहेत. या सर्व नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. असं असताना राज ठाकरे यांचे विधानसभेतील एकमेव शिलेदार असलेले आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीत सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवरुन भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“कधी कधी मला दोघांवरती शंका येते, जी निटिव्हिटी चालू आहे, विशेषतः शिंदे गटाविरोधात जे सर्व्हे आलेले आहेत, आरएसएसचा सर्व्हे असेल, इतर काही लोकांचे सर्व्हे आलेले आहेत. त्यात शिंदे गटाला खूप कमी स्थान दिलं आहे. सर्वसामान्यांचं लक्ष त्यापासून दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेली ही खेळी आहे का? असा संशय येतो. तशी यांची सवयच आहे. 2015 ला ही लोकं रस्त्यात भांडतात तसे भांडत होते. नंतर यांनी युती केली. लोकांचं कुठेतरी लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, असा मला संशय आहे”, असं राजू पाटील म्हणाले.
“हे एकाच थाळीचे चट्टेपट्टे आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यावरुन एवढं मोठं राजकारण करण्याचं काही कारण नाही. गृहखाते यांच्याकडे आहे. तडकाफडकी बदली करायच्या असतील तर हे करू शकतात. हा कुठेतरी सर्वसामान्यांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळतंय”, असा दावा राजू पाटील यांनी केला.
“जो प्रकार आळंदीला झाला तो समस्त महाराष्ट्रमधील वारकऱ्यांचा अपमान आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारे सांगड घालून चालणार नाही. मला राजकारणावरती बोलायचं नाही. कारण परिस्थिती तशी नाहीय. जे झालं निंदनीय आहे”, असं राजू पाटील म्हणाले.
“खरंतर ती घटना खूप दुर्दैवी आहे. वारकऱ्यांना मारले हे अतिशय दुःखदायक आहे. गृह मंत्रालयाने याची दखल घ्यायला हवी. पोलीस पोलिसांचं काम करतात. हे मान्य आहे. पण कोणासमोर कसं वागायचं, वारकऱ्यांना एक शिस्त असते. त्यांचा कार्यक्रम पोलीस नसले तरी शिस्तबद्ध पद्धतीने दरवर्षी ते करत असतात”, असंही ते यावेळी म्हणाले.
“शंभर टक्के यांची युती होणार असेल तर फिरवा-फिरवीचं काम सुरू आहे, दुसरं काही नाही. लोकांनी यांच्या कामावर लक्ष द्यावे. जे कर्म करतात त्यांच्यावर लक्ष द्यावे. जी रस्त्याची कामे सुरू आहेत, भरभरून आणून ओतले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 दिवसात काय हालत होते पहा. इकडे शाळा सुरू झाल्या. रस्त्याचे काम अपूर्ण आहेत. त्यांनी पर्यायी रस्त्याचं डांबरीकरण केलं नाहीय. या सर्व गोष्टींकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी यांची चाललेली ही खेळी आहे”, असा दावा त्यांनी केला.
“भविष्यात इथे शिवसेनेचाच उमेदवार येणार आणि हे सगळे एकत्र येऊन काम करतील, हे नक्की”, असं वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीमधील एका कार्यक्रमामध्ये केले.