कल्याण (ठाणे) : कल्याण शीळ रोडवरील ट्रॅफिक कोंडी सोडविण्यासाठी काय करता येईल यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकारी आणि पोलिसांसोबत रस्त्याची पाहणी केली. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी रस्त्यासाठी एमएमआरडीएकडून मंजूर करण्यात आलेल्या 360 कोटींवर भाष्य केले. “असे निधी मंजूर होतात. त्यांचे होर्डिंग लावले जातात. मात्र काम कधी सुरु होणार? आमचा निधीही त्यात सामील करण्यात आला आहे”, असा टोला आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लगावला.
कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. वाहन चालकांना तासंतास या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. रस्त्याच्या कामाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी याआधी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी या रस्त्याच्या कामाची तसेच वाहतूक कोंडीची समस्या कशाप्रकारे सोडविता येईल यासाठी आज एसआरडीसी आधिकारी आणि पोलिसांसोबत रस्त्याची पाहणी केली.
या रस्त्यावर पलावा, मानपाडा आणि सुयोय हॉटेल असे तीन जंक्शन आहे. या ठिकाणी जास्त वाहतूक कोंडी होते. ती कशी दूर करता येईल, याबाबत सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. केडीएमसीतील रस्त्यांसाठी 360 कोटी रुपये निधी एमएमआरडीएने मंजूर केल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. यावर बोलताना राजू पाटील यांचे म्हणणे आहे की, असे निधी मंजूर होता. होर्डिंग लावले जातात. कामे कधी सुरु होणार? आम्ही मंजूर केलेल्या कामाचा निधीही त्यात समाविष्ट आहे. मला श्रेय घ्यायचे नाही, असं राजू पाटील म्हणाले.
यावेळी उपस्थित असलेले एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली. “पावसामुळे कॉंन्क्रीटीकरणाचे काम थांबविण्यात आले होते. जंक्शन आम्ही इंप्रिव्ह करणार आहोत. कॉंन्क्रीटीकरणाचे काम करीत असताना थोडेफार तडे जात असतात. हे तडे आम्ही रेक्टीफाय करणार आहोत. ते आयएस कोडनुसार दुरुस्ती करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया अभियंतांनी दिली.
हेही वाचा : मलंगगडला टवाळखोरांची तरुण-तरुणींना मारहाण, तीन अल्पवयीन मुलांसह पाच जण ताब्यात