डोंबिवली (ठाणे) : डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी मनसे आामदार राजू पाटील यांच्यासह केडीएमसी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी लवकरात लवकर पाणी प्रश्न सुटला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर एका दिवशी नागरिकांचा उद्रेक होईल, असा इशाराही मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला.
डोंबिवली पूर्व भागातील काही परिसरात पाणी प्रश्न हा ज्वलंत बनला आहे. नांदीवली टेकडी, देसलेपाडा, भोपर, सागाव या परिसरातील हजारोची लोकसंख्या असलेल्या परिसरात पाणी टंचाईची समस्या आहे. जे पाणी येते त्याचा दाब कमी असतो. पाण्याचा दाब कमी असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. तासंतास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. या संदर्भात आज मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी अधिकारी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांची एक बैठक डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात घेतली. या बैठकीला नागरिकही उपस्थित होते.
नागरीक बैठकीदरम्यान संतप्त झाले. पाणी कमी दाबाने का येते? असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. औद्योगिक भागातील कंपन्यांना पाणी मिळते. नागरीकांना का मिळत नाही? असा सवाल नागरिकांनी केला. लवकरात लवकर ही समस्या सुटली पाहिजे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
या प्रकरणावर आमदार राजू पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “सात दिवसात नागरिकांना दिलासा मिळणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत एक लाईन टाकण्याचे काम पूर्ण होईल. त्याचबरोबर अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. पाणी प्रश्न सुटणार, अशी आशा आहे. पाणी प्रश्न सुटला नाही तर नागरीकांचा उद्रेक होईल”, असं राजू पाटील म्हणाले.
याबाबत एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “केडीएमसीचे अभियंता आणि एमआयडीसीचे अभियंता संयुक्त पाहणी करतील. दुर्दैवाने दोन तीन वेळा ब्रेक डाऊन झाल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवला. लवकर ही समस्या सुटेल”, असं कालीदास भांडेकर म्हणाले (MNS MLA Raju Patil warn administration over water supply).