कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत आपल्या दोन चिमुकल्यांना खाडीत सोडून गेल्या महिलेचा अद्यापही शोध लागलेला नाही. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेला 16 दिवस उलटून गेले आहेत. रत्नमाला साहूने आपल्या दोन चिमुकल्यांना सोडून आत्महत्या केली असावी, अशी भीती व्यक्त केली जात आहे, मात्र अद्याप तिच्याविषयी कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही. (Mother of two children found near Dombivali Creek is still missing)
सहा महिन्यांच्या बाळासह दोन वर्षांचा चिमुरडा सात डिसेंबरला खाडीतील पाण्याच्या मधोमध असलेल्या भूभागावर सापडल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. घटनेपूर्वी रत्नमाला आपल्या दोन लहान मुलांसोबत जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. टिळकनगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र मुलांची आई नेमकी कुठे आहे? तिच्यासोबत काय घडले असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ठाकुर्लीत राहणारे चिमुकल्यांचे वडील सुब्रतो साहू दोन दिवसांनी पोलिसांसमोर आले. लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी, आर्थिक चणचण आणि पती-पत्नीतील वाद यामुळे चिमुकल्यांवर ही दुर्दैवी वेळ आल्याचं समजलं.
पती-पत्नीचे वाद लेकरांच्या अंगलट
चिमुकल्यांच्या वडिलांचा शोध लागल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. मात्र त्यांची आई अद्यापही बेपत्ता आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. त्यानंतर आर्थिक तंगीमुळे आमच्यात थोडे-फार वाद होते, मात्र पत्नी रत्नमाला साहू टोकाचे पाऊल उचलेल, असे वाटत नसल्याचं सुब्रतो साहू यांनी सांगितलं होतं. (Mother of two children found near Dombivali Creek is still missing)
काळजाचा ठोका चुकवणारी घटना
डोंबिवलीतील खाडीत पाण्याच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या दगडावर 7 डिसेंबरच्या संध्याकाळी सहा महिन्यांचे बाळ आणि दोन वर्षांचा लहानगा रडत होते. पाण्याची पातळी वाढत असतानाच मुलांच्या रडण्याचा आवाज काही ग्रामस्थांच्या कानावर गेला. त्यांची नजर या दोन्ही लहान मुलांवर गेली आणि सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला. कचोरे गावातील गणेश मुकादम आणि तेजस मुकादम हे दोन तरुण धीराने पाण्यात उतरले. दोन चिमुकल्यांना बाहेर काढून त्यांना विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पतीला अजूनही आशा
लहान मुलांजवळ आईचा मोबाईल सापडला. त्यानंतर ठाकुर्ली परिसरात राहणारा सुब्रतो साहू ही व्यक्ती पोलिसांसमोर आली. स्नेहांश साहू आणि अयांश साहू अशी मुलांची नावं असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. आर्थिक परिस्थिती खालावल्याने पत्नी रत्नमाला साहूसोबत वाद व्हायचा. मात्र ती इतक्या टोकाचे पाऊल उचलेल, असं सुब्रतो यांना आजही वाटत नाही.
संबंधित बातम्या –
आई बेपत्ता आणि दोन चिमुरडे भर पाण्यात, काळजाचा ठोका चुकवणारी घटना
डोंबिवलीच्या खाडीत सापडलेल्या चिमुकल्यांना अजूनही आईची आस
(Mother of two children found near Dombivali Creek is still missing)