कल्याण (ठाणे) : कल्याण ग्रामीणमधील 27 गावात पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी या प्रश्नावर अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. आता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने महापालिका, एमआयडीसी अधिकारी आणि स्थानिकांची बैठक सोमवारी (19 जुलै) पार पडली. या बैठकीत लवकरात लवकर ही समस्या कशी सुटणार यावर चर्चा करण्यात आली.
कल्याण ग्रामीणमध्ये अनेक भागात पाण्याची समस्या आहे. सागाव, नांदिवली, भोपर, देसलेपाडा याभागात कमी दाबाने पाणी येते. पाणी अनियमित स्वरुपात येत असल्याने नागरीक त्रस्त आहेत. या समस्येमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकारी आणि स्थानिक नागरीकांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर आमदारांनी प्रशासनाला पाणी प्रश्न सुटला नाही तर नागरीकांचा उद्रेक होणार, असा स्पष्ट इशारा दिला होता. त्यावर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं.
आता या प्रश्नावर कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. केडीएमसी मुख्यालयात केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमआयडीसीचे सीओ, स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि नागरिकांची बैठक झाली. या बैठकीस खासदार ऑलनाईन होते. या बैठकीत त्यांनी ही समस्या लवकर सुटली पाहीजे, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. अमृत योजना पूर्ण होईपर्यंत महापालिकेच्या पाणी टाक्यातून पाणी टंचाईग्रस्त भागाला पाणी पुरवठा केला पाहिजे, अशी माहिती शिवसेना पदधिकारी प्रकाश म्हात्रे यांनी दिली आहे. या बैठकीत योगेश म्हात्रे, बंडू पाटील, एकनाथ पाटील, मुकेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.