एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्याने बायकोला तलाक; पतीचा मुजोरपणा, कायद्यालाही जुमानेना, ठाण्यात एकच खळबळ

| Updated on: Dec 14, 2024 | 6:11 PM

Thane Talak News : ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीने तलाक दिला. विशेष म्हणजे पतीने बायकोच्या वडिलांना फोन करून तिला तलाक दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्याने बायकोला तलाक; पतीचा मुजोरपणा, कायद्यालाही जुमानेना, ठाण्यात एकच खळबळ
तलाक प्रकरणात गुन्हा
Follow us on

ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्याने पतीचा राग अनावर झाला. त्याने संतापाच्या भरात बायकोला तलाक, घटस्फोट दिला. त्याने याची माहिती पत्नीच्या वडिलांना फोनवर दिली. या तिहेरी तलाक प्रकरणात पत्नीने पतीच्या विरोधात मुस्लिम महिला कायदा कलम 4 प्रमाणे तिहेरी तलाकच्या कायद्याखाली (Triple Talaq Act) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार. 27 जानेवारी 2024 रोजी कुर्ल्याच्या अलिखान याच्याशी महिलेचा विवाह झाला होता. ही महिला गर्भवती असल्यामुळे ती कुर्ल्यातून आपल्या आई-वडिलांच्या घरी मुंब्रा येथे राहत होती. 10 डिसेंबर 2024 रोजी अलिखान याने आपल्या पत्नीला फोन केला असता ती मॉर्निंग वॉकसाठी गेल्याचे समजले. यावर पतीने तिला परत कुर्ल्यात येण्यास सांगितले. मात्र, परिस्थितीमुळे ती येऊ शकत नसल्याचे सांगताच पतीने फोन ठेवला. महिला घरी पोहोचल्यावर अलिखानने पुन्हा फोन करून स्पीकर ऑन करण्यास सांगीतले. आणि तिच्या कुटुंबासमोर तीनदा तलाक दिला.

हे सुद्धा वाचा

या घटनेनंतर महिलेला आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलीसांनी पती अलिखान याच्याविरोधात ट्रिपल तलाक कायद्याखाली गुन्हा नोंदवला. प्रकरणात पोलीसांनी त्याला नोटीस बजावली आहे. तसेच मॉर्निंग वॉकच्या कारणामुळे तलाक दिला की यामागे काही वेगळे कारण आहे, हे तपासले जात आहे. तपास अधिकारी रविंद्र पाखरे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

तलाक असंवैधानिक

सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षांपूर्वी, 22 ऑगस्ट 2017 रोजी तिहेरी तलाकवर निकाल दिला होता. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने तलाक असंवैधानिक असल्याचा निर्वाळा दिला आहे. याप्रकरणी सरकारला कायदा करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले होते. या निकालानंतर केंद्र सरकारने तीन तलाक, तिहेरी तलाक लिहून अथवा बोलून लग्न मोडल्यास गुन्हा दाखल करण्याविषयी कायदा केला होता. या कायद्यान्वये जास्तीत जास्त 3 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.