कल्याण : कल्याण-डोंबिवली (KDMC) महापालिकेच्या रिंग रोड प्रकल्पात (Ring road Project) 840 जणांची घरे गेली आहेत. ज्यांची घरे गेली आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे यासाठी गेल्या दहा दिवसांपासून अ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने आज महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ उपोषणकर्त्यांनी मुंडन करुन प्रशासनाचा जाहिर निषेध व्यक्त केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचा रिंग रोड हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प सात टप्प्यातील आहे. त्यापैकी दुर्गाडी ते टिटवाळा हा 17 किलोमीटर टप्प्यातील काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील आटाळी आंबिवली दरम्यान 840 जणांची घरे गेली आहेत
वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप
यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार पुनर्वसनासाठी पाठपुरावा केला. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही दाद मागितली. मात्र त्यांचा प्रश्न सुटला नाही. असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अखेरीस त्यांनी 10 जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले. त्यांच्या उपोषणाची दखल प्रशासनाने अद्याप घेतली नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते आता चांगलेच संतापले आहेत.
काल उपोषणकर्ते जालिंदर बव्रे यांनी शहर अभियंत्या सपना कोळी यांना फोन केला होता. त्यांनी त्यांना महत्वाचे काय आहे ते बोला असे सांगून फोन ठेवून दिला. असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय. प्रशानसन आमच्याकडे लक्ष देत नाही, आमच्या मागण्या ऐकूनही घेत नाही, त्यामुळे प्रशासनाचा मुंडन करून निषेध नोंदवत असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात प्रशासन या आंदोलनकर्त्यांची दखल घेते की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.