आनंद आश्रमात पैशांची उधळण करणाऱ्यांवर अखेर कारवाई; शिवसेनेच्या पत्रात काय?

| Updated on: Sep 15, 2024 | 10:26 AM

Action Against Anand Ashram Viral Video : आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात पैशांची उधळण करणाऱ्यांवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी याबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्रात नेमकं काय आहे? पैसे उधळणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली आहे? वाचा सविस्तर...

आनंद आश्रमात पैशांची उधळण करणाऱ्यांवर अखेर कारवाई; शिवसेनेच्या पत्रात काय?
ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ समोर
Follow us on

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं वास्तव्य असलेल्या ठाण्यात आनंद आश्रमातील एक धक्कादायक व्हीडिओ समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद आश्रमात नोटा उधळल्याचं समोर आलं आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा व्हीडिओ ट्विट केला. यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून यावर टीका केली जात आहे. असं असतानाच आता आनंद आश्रमात पैशांची उधळण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत पत्र लिहिलं आहे.

आनंद आश्रममध्ये नेमकं काय घडलं?

12 सप्टेंबर 2024 ला आनंद दिघे यांच्या आश्रमात पैशांची उधळण करण्यात आली आहे. यावरून सध्या वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून विशेषत : शिवसेना ठाकरे गटाकडून यावर जोर जोरदार टीका केली जात आहे. अशातच शिवसेनेकडून पैसा उधणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आनंद आश्रममध्ये पैशांची उधळण करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणाचा खुलासाही मागण्यात आला आहे.

पत्र जसंच्या तसं

प्रति,

नितीन पाटोळे

12 सप्टेंबर 2024 रोजी गणपती विसर्जनाच्या रात्री आपल्याकडून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये जे कृत्य घडलं. ते अतिशय निंदनीय असून त्यामुळे आपल्या पक्षावर चौफेर बाजूने टीका होत आहे. सदर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या कारणास्तव आपल्याला पदावरून काढून टाकण्यात येत आहे. तरी सदर घडलेल्या प्रकाराबद्दल दोन दिवसात खुलासा करावा.

आपला स्नेहांकीत
नरेश गणपत म्हस्के

ठाकरे गटाचा निशाणा

आनंद दिघे यांचं वास्तव्य असलेल्या आनंद आश्रमामध्ये दिघे यांच्या फोटोसमोर पैशांची उधळण करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार टीका केली. आनंद दिघे यांना तुम्ही आपले गुरु मानत आहात आणि त्यांची जी वास्तू होती. त्या वास्तूमध्ये ते न्याय द्यायचे. तिथे त्यांचं वास्तव्य होतं. त्या वास्तूमध्ये या मिंधे सेनेच्या लोकांनी गुंडांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात. त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला. हे चित्र अत्यंत विचलित करणारा चित्र आहे. त्यामुळे आता कोण माफी मागत असेल पदावरून काढल असेल अमुक असेल ही पूर्णपणे नौटंकी आहे, असं संजय राऊत म्हणालेत.