ठाणे: ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्ताने काल ठाणे आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या बॅनर नंतर नजीब मुल्ला शिंदे गटात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या. या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नजीब मुल्ला ह्यातीत शिंदे गटात जाणार नसल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाचे नेते, प्रवक्ते, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शेरोशायरीतून थेट नजीब मुल्ला यांना पक्षप्रवेशाचं आवतनच दिलं आहे.
ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांचा काल अत्यंत थाटात वाढदिवस साजरा झाला. यावेळी शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्केही उपस्थित होते. नरेश म्हस्के यांनी नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजर राहून एकप्रकारे नजीब मुल्ला यांना शिंदे गटात येण्याचं आवतनच दिलं. यावेळी शुभेच्छा देताना म्हस्के यांनी शेरोशायरीही सादर केली. या शेरोशायरीतून त्यांनी थेट मुल्ला यांना शिंदे गटात येण्याचं निमंत्रण दिलं आहे.
मार्ग तुझा रोखू शकेल असा कोण जन्मालाच नाही…
तुझा मार्ग तुला ठरवण्याचा अधिकार आहेच ना रे भाई…
ठरव आता बुडत्या जहाजात बसायचं की…
महाराष्ट्रात एक झुंझार नेता म्हणून दिसायचं!…
अवघ्या चारओळींची ही शायरी आहे. त्यातून म्हस्के यांनी तुझा मार्ग तुला ठरवण्याचा अधिकार आहे असं सांगत जितेंद्र आव्हाड यांच्यावर भरवसा ठेवू नको, असंच एकप्रकारे सूचवलं आहे. या शिवाय बुडत्या जहाजात बसायचं की महाराष्ट्रातील नेता म्हणून दिसायचं हे ठरवण्याचं आवाहनही केलं आहे. म्हस्के यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला बुडतं जहाज म्हटलं आहे. तसेच नजीब मुल्ला यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची अप्रत्यक्ष ऑफरही दिली असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, नरेश म्हस्के यांनी कालच्या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाचे जे बॅनर लागलेले आहेत त्यावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीच्या जवळजवळ 5 ते 6 नगरसेवकांचे फोटो आहेत.
त्यांनी वर आमचे फोटो लावले आहेत. पण बॅनर राष्ट्रवादीचा आहे. जर राष्ट्रवादीचे नगरसेवक बॅनर लावत असतील आणि त्यावर आमचे फोटो असतील तर त्याबाबत तुम्ही जितेंद्र आव्हाड यांनाच विचारा, असा टोला नरेश म्हस्के यांनी काल लगावला होता.
जर राष्ट्रवादीचे नगरसेवक आमचे फोटो बॅनरवर लावत असतील तर आम्हाला नक्कीच आनंद आहे. नजीब मुल्ला हे खूप चांगले कार्यकर्ते आहेत. सीनियर नगरसेवक आहेत. हुशार आहेत. आमदारकीचं परफेक्ट मटेरियल हे नजीब मुल्ला यांच्यामध्ये दिसून येतं. जर ते आमच्या पक्षात येणार असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू, असंही त्यांनी म्हटलं होतं.