ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपमध्ये गेलेले नेते हाजी अराफत शेख यांचा दाखला देत गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या टीकेला उत्तर दिलं. “तुम्ही बोललात की मशिदीत वस्तरा कसा सापडेल, कारण ते (मुस्लीम बांधव) दाढीच करत नाहीत, तुम्ही विसरलात का, तुमचा एक मित्र होता, हाजी अराफत शेख, जो आता भाजपचा अल्पसंख्याक विकास प्रमुख आहे, तो मनसेच्या वाहतूक सेनेचा अध्यक्ष होता. त्याच्या बाजूला बसून तुम्ही कित्येक वेळा जेवायचात, विसरलात का, तो दाढीच करायचा नाही, साफ दाढीचा होता, असं आव्हाड म्हणाले. मशिदीत वस्तरा जरी सापडला तरी बघा, या आव्हाडांच्या जुन्या टीकेला मंगळवारी ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी उत्तर दिलं होतं. सुळे घुसले की किती त्रास होतो हे तुम्हाला माहित आहे ना, असं म्हणत आव्हाडांनी राज ठाकरेंनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.
तुम्हाला फक्त स्मृतीत आणून देत आहे, बाकी काहीही करत नाही. मी 2009 मध्ये मुंब्य्राला गेलो, तेव्हापासूनचा इतिहास चाचपडून पाहा, फक्त दोन वेळा अतिरेकी सापडले, तेही बाहेरुन आलेले, कारण मुंब्य्रात आता इतका बदल झाला आहे, की लोक वेगळा विचार करणारच नाहीत, असं आव्हाड म्हणाले. राजसाहेब, बोलताना इतिहास, आपल्या बाजूला कोण बसलंय, हे पाहा, असंही आव्हाड म्हणाले.
तुम्ही एक उदाहरण दिलंत, तुमच्या समोर एक मुसलमान बसला होता, त्याला दाढी होती का, तुम्ही मुसलमानांना सर्टिफिकेट देणार का, की हा देशद्रोही आहे, हा नाही, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर जाता, नाकावर जाता, रंगावर जाता, तुमच्यात वर्णद्वेष, जातीवाद किती ठासून भरलाय हे दिसतं. रंग-वर्ण हे कधीही काढू नये. आम्ही जर म्हटलं तुम्ही कसे ढोरपोटे झालाय, तुमचं तोंड कसं सुजलंय, तर तुम्हाला आवडेल का, अशी बोचरी टीकाही आव्हाडांनी केली.
संबंधित बातम्या :
अजित पवार, तुमच्या माहितीसाठी म्हणून तीन व्हिडीओ आणलेत, राज ठाकरेंचं पुन्हा लाव रे तो व्हिडीओ
तर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, राज ठाकरे भोंगे लावण्यावर ठाम, आता कारणेही सांगितली
उभा टाक, राज ठाकरेंनी भर सभेत नगरसेवक सलीम मामू शेखला जेव्हा उभं केलं