ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्यावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आल्याचा धक्कादायक दावा केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकुर (Raja Thakur) याला हल्ल्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी पत्रात केला. संजय राऊत यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी त्याहीपेक्षा धक्कादायक दावे केले आहेत.
जितेंद्र आव्हाड हे माजी मंत्री आहेत, तसेच ते अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया ही महत्त्वाची आहे. “कुणी सुपारी दिली मला माहित नाही. पण एकंदर मी जो अनुभव गेल्या 8-10 दिवसांत घेतलाय, त्यानुसार ठाणे महापालिकेच्या प्रत्येक मजल्यावर गँगस्टर उभे असतात. महापालिकेचे अधिकारी त्यांना एक-एक, दोन-दोन लाख रुपये देत असतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले की त्यांना जामिनासाठी पैसे पुरवतात”, असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“जशी पूर्वी दगडी चाळ होती, पाकमोडिया स्ट्रीट होती, तशीच आता ठाणे महापालिका झाली आहे. गेल्या 4-5 महिन्यातले व्हिडीओ कॅमेरे चेक करा आणि कोण-कोण, कुठे-कुठे येऊन बसतात ते चेक करा”, असं आव्हाड म्हणाले. “दाऊदची माणसं केबीनमध्ये येऊन बसतात. गप्पा मारतात, चहा पितात. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. त्यांना आमंत्रित केलं जातं”, असंही खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं.
“याच्यावर काय बोलायचं? कारण बोलणाऱ्याचा जीवच धोक्यात आहे. कारण आत्ता मी जे बोललो ते प्रत्येक गँगस्टरच्या मनाला लागणार आहे. त्यामुळे मी तर त्यांचा दुश्मन आहेच, आता अजून झालो. आमच्या सिक्युरिटीची व्यवस्था नाही, वाढवण्याचीही गरज नाही”, असंही ते यावेळी म्हणाले.
“एखादा अधिकारी बिनधास्त सांगतो की मी दिवसाला 40 लाख रुपये कमावतो आणि 20 लाख रुपये वाटतो. अजून त्याला साधं चौकशीला नाही बोलावलं”, असं जितेंद्र आव्हाड सहाय्यक आयुक्त महेश आहेर प्रकरणावर म्हणाले.
“तो बिनधास्त सांगतो की मी बाबाजीला सांगून फिल्डिंग लावली आहे. हा बाबाजी कोणी पूजनीय माणूस नाहीये. तो अंडरवर्ल्डचा सुपरस्टार आहे. ज्याने दाऊदच्या सांगण्यावरून जेजे हॉस्पिटलमध्ये फायरिंग केलं तो माणूस आहे. म्हणजे एकीकडे दाऊदच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि दाऊदलाच वापरायचं?”, असा सवाल त्यांनी केला.