ठाणे: ठाण्यात सुटलाय तुफान वारा,12 तारखेला कुणाचे वाजणार बारा?… अशा कवितेच्या ओळी असलेल्या पोस्टची सध्या ठाण्यात तुफान चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ही कविता ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यातून त्यांनी राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं टेन्शन वाढलं आहे. ठाण्यात जितेंद्र आव्हाडांना अव्हॉईड करून बरेच नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षात प्रवेश करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. आव्हाड आणि त्यांच्या कंपूला कंटाळून ही मंडळी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळेच येत्या 12 तारखेला आम्ही त्यांचे बारा वाजवणार आहोत, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. त्यावर आम्ही 12 तारखेला त्यांचे बारा वाजवून उत्तर देणार आहोत. आव्हाड केवळ प्रसिद्धीसाठी सर्व काही करत असतात. त्यांना आपले नगरसेवक सांभाळता येत नाही. आधी त्यांनी आपले नगरसेवक सांभाळावेत आणि मगच आमच्यावर टीका करावी. त्यांच्या जाचाला आणि त्यांच्या चांडाळ चौकडीच्या कंपूशाहीला कंटाळून हे नगरसेवक आमच्यासोबत येत आहेत, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
जो नगरसेवक प्रामाणिक काम करतो त्याच्या कामाला अडचणी निर्माण करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना कंटाळून राष्ट्रवादीचे नगरसेवक राष्ट्रवादी सोडत आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने संपूर्ण राष्ट्रवादी रिकामी होणार आहे.
आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नये. आतापर्यंत तुम्ही जे ठाण्यात काम करू शकलात ते केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यामुळेच. याचं भान आपण ठेवा, असा इशाराही म्हस्के यांनी दिला आहे.
ठाण्यात सुटलाय तुफान वारा
१२ तारखेला कुणाचे वाजणार बारा ?
॰॰॰॰॰॰॰
बाळासाहेबांच्या सेनेकडे झुंडीने येऊ लागले,
राष्ट्रवादीचे नगरसेवक कुणाला ‘आव्हाइड’ करु लागलेत ?
॰॰॰०००००@abpmajhatv @LokshahiMarathi @News18lokmat @zee24taasnews @JayMaharashtrN @NcpThane— Naresh Mhaske (@nareshmhaske) February 10, 2023
एक आला, दोन आले,
हा ओघ राहील निरंतर
आव्हाडांच्या अरेरावीला
नगरसेवकांचे चोख उत्तर !
कितीही बोला, कुणासही टोले मारा
घड्याळात तुमच्या आता वाजणार बारा
ठाण्यात सुटलाय तुफान वारा
12 तारखेला कुणाचे वाजणार बारा ?
बाळासाहेबांच्या सेनेकडे झुंडीने येऊ लागले,
राष्ट्रवादीचे नगरसेवक कुणाला ‘आव्हाइड’ करु लागलेत ?
दरम्यान, ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यात शिंदे गटाला यश आले असून ठाण्याचे अत्यंत ज्येष्ठ असणारे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे आणि त्यांचे 4 सहकारी असे एकूण 5 माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे ठाण्यात राष्ट्रवादी कांग्रेसला मोठा हादरा बसल्याच सांगण्यात येतंय.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी येत्या 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे 12 वाजविणार असा इशारा दिला होता. त्याप्रमाणे 12 फेब्रुवारीला हणमंत जगदाळे आणि इतर 4 जण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.
ठाण्यातील लोकमान्य नगर भागात या जगदाळे यांच्या बालेकिल्लात प्रवेशाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जगदाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यांच्या अनेक कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शविली होती.
अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला असून स्वतः हणमंत जगदाळे, सुधाबाई जाधवर, दिगंबर ठाकुर, वनिता घोंगरे या माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.