ठाणे: कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ आता ठाण्यातील भाजपचे दोन आमदारही खड्ड्यांवरून आक्रमक झाले आहेत. ठाण्यातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी खड्ड्यांवरून महापालिका प्रशासन आणि शिवसेनेला धारेवर धरले आहे. ठाण्यातील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत, असा आरोप या दोन्ही आमदारांनी केला आहे. (niranjan davkhare and sanjay kelkar slams shiv sena over potholes in thane)
ठाण्यातील खड्ड्यांमुळे गेले अनेक दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम ठेकेदारांनी व्यवस्थित न केल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजवण्यासाठी पालिकेला अपयश येत आहे. त्यामुळे प्रशासन असो या सत्ताधारी यांच्यामुळे ठाण्यातील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत. मुंबई खड्डे दाखवा आणि पारितोषिक मिळवा, अशी स्पर्धा लावलेली असते. ठाण्यात अशी स्पर्धा लावली तर ठाणेकर कोरोडो रुपये कमावतील, असा चिमटा आमदार निरंजन डावखरे यांनी काढला आहे.
ठाण्यात महापालिका स्तरावर खड्डे बुजवण्याचं काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाची बनवाबनवी सुरू आहे, अशी टीकाही डावखरे यांनी केली आहे. तर, खड्ड्यांच्या मुद्दयावरून सत्ताधारी आणि पालिका प्रशासन ठाणेकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे करत आल्याचा आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. भाजपाच्या वतीने ठाण्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेत घोषणा बाजी करत खड्डे बुजवण्याचे काम केले. यावेळी भाजपने ठाण्यातील रस्त्यांची पाहणीही केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला आहे. त्याची दखल खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. शिंदे यांनी ठाण्यातील खड्डयांची पाहणी करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या पालिकेच्या चार अभियंतांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेने आज ही कारवाई केली. उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर-वर्तक नगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे कालमर्यादेत बुजविण्यात या अभियंत्यांना अपयश आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पालिकेने अभियंत्यांवर कारवाई केली. मात्र, कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार असा सवाल या निमित्ताने केली जात आहे.
दरम्यान, पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. एकनाथ शिंदे यांनी तीन हात नाका सिग्नलसह शहरातील विविध रस्त्यांची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठाणे आणि ग्रामीण पोलीसही त्यांच्यासोबत होते. यावेळी शिंदे यांनी रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या दर्जाचीही पाहणी केली. यावेळी रस्त्यांची चाळण झालेली पाहून शिंदे यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जे काम केले आहे ते चांगले काम करा. पावसाळ्यापूर्वी ज्या रस्त्यांची कामे करण्यास सांगितले होते ती कामे पूर्ण करा. रस्त्यावरील खड्ड्यांच्या रोज बातम्या येत आहेत. लोक वैतागत आहेत. त्यामुळे आम्हाला शिव्या खाव्या लागत आहेत. कंत्राटदार रस्त्यांचे काम नीट करत नसतील तर त्यांना ब्लॅक लिस्ट करा, अशा सूचना देतानाच मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी देखील या कामात लक्ष घातलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (niranjan davkhare and sanjay kelkar slams shiv sena over potholes in thane)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 28 September 2021 https://t.co/og9l4pXrVs #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2021
संबंधित बातम्या:
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स, एकनाथ शिंदेंची घोषणा
पालिका अधिकाऱ्यांना खड्डे भोवले; ठाणे महापालिकेचे चार अभियंते निलंबित
(niranjan davkhare and sanjay kelkar slams shiv sena over potholes in thane)