ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकात मोटारमनच्या सर्तकतेमुळे एका 86 वर्षीय वयोवृद्धांचा जीव वाचला आहे. वयोवृद्ध आजोबांचे नाव हरीप्रसाद कर्ण आहे. अंघोळीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या वादातून तसेच दुसऱ्याही मुलाच्या घरी बिनसल्यामुळे या आजोबांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करताना या आजोबांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आजोबांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न नेमका का केला असावा ? असा प्रश्न लोक विचारत आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती समोर आली आहे. (Old man tried to suicide on Kalyan railway station have been saved by loco pilot)
मिळालेल्या माहितीनुसार व्हिडीओमध्ये दिसणारे आजोबा हे आडीवली ढोकली परिसरात राहतात. त्यांचे नाव हरीप्रसाद कर्ण असून ते ज्या घरात राहत होते तेथे पाणी नव्हते. याच कारणामुळे त्यांनी आपल्या नातीला पाणी आणून देण्याचे सांगितले. मात्र, नातीने पाणी देण्यास नकार देत “बाबा तुमचा दुसरा मुलगा पण आहे. तुम्ही तिकडेही जाऊ शकता,” असे सांगितले. त्यानंतर वृद्ध हरीप्रसाद कर्ण रागावले. ते त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या घरी गेले. मात्र, या ठिकाणीसुद्धा आजोबांचे कोणत्यातरी कारणामुळे बिनसले. त्यानंतर रागाच्या भरात आजोबांनी कल्याण रेल्वे स्थानकात धाव घेतली.
रेल्वस्थानकावर आल्यानंतर ते फलाट क्रमांक चारवर मुंबई-बनारस एक्स्प्रेस या रेल्वेजवळ आले. ही गाडी सुरु होताच आजोबा ट्रेनसमोर उतरले. हे सगळं काही अचानकपणे घडल्यामुळे लोको पायलट एस. के. प्रधान आणि सहाय्यक लोको पायलट रवी शंकर हे काही काळासाठी गोंधळले. मात्र, त्यांच्याच सर्तकतेमुळे आजोबांचे प्राण वाचले. आजोबा गाडीसमोर आल्याचे पाहून एस.के. प्रधान आणि रवी शंकर यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबले. परिणामी इंजिनखाली येऊनसुद्धा आजोबा हरीप्रसाद बचावले.
पाहा व्हिडीओ :
Trespassing railway tracks is dangerous and illegal but still people take the risk. A senior citizen narrowly escaped death after a locomotive train in Mumbai’s Kalyan area applied emergency brakes to save the man as he was crossing the tracks. pic.twitter.com/snEy25APul
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) July 18, 2021
दरम्यान, आडीवली ढोकली परिसरातील पाणी प्रश्नावर प्रशासनाचे स्थानिक माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी लक्ष्य वेधले आहे. आज पुन्हा पाणी प्रश्नामुळे एका आजोबांवर आत्महत्येची वेळ आली. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगून आतातरी प्रशासनाने जागे होण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे फक्त पाणी मिळाले नाही म्हणून आजोबांनी एवढे मोठे पाऊल उचलल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजोबांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इतर बातम्या :
Mumbai Rains : मुंबईतील डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
Mumbai Rains: मुंबईत पावसाचं धुमशान; पालिकेने 10 तासांत उपसले तब्बल 442 कोटी लिटर पाणी!
(Old man tried to suicide on Kalyan railway station have been saved by loco pilot)