अंबरनाथ : अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा बिबट्यानं शिकार केल्यामुळे घबराट पसरली आहे. अंबरनाथ शहरालगतच्या वसत गाव परिसरात महिनाभरात तिसऱ्यांदा बिबट्याने दर्शन दिलं असून स्थानिक ग्रामस्थांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. त्यामुळे या परिसरात मोठी घबराट पसरली आहे. अंबरनाथजवळच्या वसत गावातले बाळकृष्ण साळुंके हे आज सकाळी बकऱ्या चारण्यासाठी गावाजवळच्या जंगलात गेले होते.
यावेळी त्यांच्या डोळ्यादेखत बिबट्याने एका बकरीवर हल्ला केला आणि घेऊन जाऊ लागला. साळुंके यांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्या हा बकरीला तिथेच टाकून पळून गेला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाला पाचारण केलं असता, वनविभागाने बिबट्यानेच हा हल्ला केल्याची पुष्टी केली.
दरम्यान, वसत, जांभूळ या परिसरात यापूर्वी सुद्धा बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये आधीच दहशतीचं वातावरण असून त्यात भर म्हणून बिबट्या वारंवार हल्ले करत असल्यानं बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र याकडे वनविभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मागील महिनाभरात बिबट्याने या परिसरातील तीन पाळीव प्राण्यांची शिकार केलीये. आधी वसत गावातील गुरुनाथ माळी यांच्या गोठ्यातून या बिबट्याने गायीचं वासरू उचलून नेत त्याची शिकार केली होती, त्यानंतर हिरामण साळुंके हे बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेले असताना त्यांच्या डोळ्यासमोर बिबट्याने एका बकरीची शिकार केली. त्यानंतर आज या बिबट्याने बाळकृष्ण साळुंके यांच्या बकरीची शिकार केली. बिबट्याच्या या सततच्या हल्ल्यांमुळं ग्रामस्थ धास्तावले असून वनविभागाने यावर काहीतरी उपायोजना करण्याची मागणी करण्यात येतेय. (Once again a leopard was seen in Ambernath)
इतर बातम्या
CCTV VIDEO | चौकात भरधाव बाईक चालवणं अंगलट, दुचाकीस्वारांची भीषण धडक, एक जण गंभीर