Palghar Constituency Update : ‘अब की बार 400 पार’ चा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप प्रत्येक ठिकाणी विजयाची गणितं जुळवत आहे. भागाकाराचा गुणाकार आणि वजाबाकी ऐवजी बेरजेच्या राजकारणावर भाजपने जोर दिला आहे. पालघर मतदारसंघात अभिनव प्रयोग करण्यात येत आहे. भाजपने पालघरची मोहिम हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा विजयाची गणितं जुळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात भाजपला मोठे यश आले आहे. पालघर जिंकण्यासाठी भाजपसोबत श्रमजीवी संघटना मैदानात उतरली आहे.
अगोदर शिंदेकडून मतदारसंघ खेचला
भाजपने या मतदारसंघासाठी अगोदरच फिल्डिंग लावली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मतदारसंघावर दावा पण सांगितला होता. विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून भाजपने हा मतदारसंघ खेचून आणला. हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपने ही जागा जिंकण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.
बहुजन विकास आघाडीने दाखवला हात
बहुजन विकास आघाडीची या पट्यात दबदबा आहे. आघाडीचे तीन आमदार या भागात आहेत. बहुजन विकास आघाडीशी जुळवून घेण्याचा भाजपचा प्रयत्न हिंतेंद्र ठाकूर यांनी हाणून पाडला. त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. ठाकरे गटाकडून भारती कामडी मैदानात आहेत. यावर भाजपने मग एक राजकीय तोडगा काढला.
श्रमजीवी संघटना मैदानात
आदिवासींच्या हक्कासाठी आणि इतर अनेक सामाजिक कार्यात श्रमजीवी संघटना काम करते. पालघर, ठाणे, वसईसह इतर भागात श्रमजीवीचे आफाट काम आहे. यापूर्वी पण श्रमजीवीचा कल भाजपकडेच झुकलेला होता. माजी आमदार आणि श्रमजीवीचे प्रमुख विवेक पंडित यांना गोटात आणण्यात भाजपला मोठे यश आले आहे. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत श्रमजीवीचे प्रमुख विवेक पंडित यांची यशस्वी बैठक झाली. त्यांनी पालघरमध्ये भाजप उमेदवार हेमंत सावरांना श्रमजीवीचा पाठिंबा जाहीर केला. महायुतीत नवीन भिडू आल्याने भाजपने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा होत आहे. निकालानंतर भाजपची खेळी किती यशस्वी ठरली हे समोर येईल.