PM Narendra Modi Thane Tour : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता महिला सशक्तीकरण कार्यक्रमासह विविध प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ठाण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाण्यातील घोडबंदर रोड भागात दौरा आयोजित करण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील वालावलकर मैदानावर उद्या संध्याकाळी 4 वाजता भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मोठी जय्यत तयारीही केली जात आहे. त्यासोबतच वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन मुख्य सभामंडपाच्या ठिकाणी भव्य तिहेरी आच्छादित तंबू उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सभास्थानापासून 800 मीटर अंतरावर तीन हेलीपॅड बनवण्यात आले आहेत. तसेच 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांच्या बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच मैदानापासून काही अंतरावर 12 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. पंतप्रधान मोदी सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासह ठाण्यातील अंतर्गत मेट्रो, नवीन महापालिका मुख्यालय, नैना पायाभूत सुविधा प्रकल्प यांचे भूमिपूजन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यानिमित्त अनेक महत्त्वाच्या आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुकीची एक नियमावली बनवण्यात आली आहे. ठाणे शहरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्यातील काही मार्गांवर वन वे वाहतूक असणार आहे. या कार्यक्रमावेळी ठाणे ते घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ता, डि-मार्ट ते टायटन हॉस्पिटल, घोडबंदर ठाणे वाहिनी सर्व्हिस रोड, ओवळा ते वाघबीळ नाक्यापर्यंत वाहने पार्किंग करण्यास मनाई असेल. या काळात हा मार्ग वन वे करण्यात आला आहे.
तसेच टायटन हॉस्पिटल कडून डीमार्टकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टायटन हॉस्पिटल येथे प्रवेश बंद असणार आहे. त्याऐवजी ही वाहने टायटन हॉस्पिटलकडून डीमार्टकडे जाण्यासाठी ओवळा सिग्नल येथून मुख्य रस्त्याने कासारवडवली, वाघबीळ ब्रिजखालून सोडली जातील.
त्यासोबतच वाघबीळ नाक्याकडून ओवळयाकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व वाहनांना वाघबीळ नाका, सिग्नल येथे प्रवेश बंद असेल. त्याऐवजी ही वाहने वाघबीळ नाक्याकडून आनंदनगर आणि कासारवडवलीकडे जाण्यासाठी टीजेएसबी बँक चौक, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे वळवण्यात येतील.
ही वाहने वाघबीळ नाक्याकडून ओवळयाकडे जाण्यासाठी वाघबीळ ब्रिजखालून मुख्य रस्त्याने बाहेर पडतील. तसेच टायटन हॉस्पिटल ते डि-मार्ट सर्व्हिस रोड तसेच वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका नो पार्किंग झोन राहणार आहे.
ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी ठाण्यात ही वाहतूक बदल करण्याचे आदेश दिले आहेत. ही वाहतूक अधिसूचना 3 ऑक्टोबरपासून रात्री ते कार्यक्रम संपेपर्यंत असणार आहे. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा आदेश लागू राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.