छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटना प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या राहत्या घरी आला होता. पण पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेतले आहे. जयदीप आपटे याच्या विरोधात पोलिसांनी लुकआऊट जारी केली होती. आपटे पुतळा कोसळल्यापासून फरार होता. अखेर त्याला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी जयदीपला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. जयदीप सापडल्यामुळे आता या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरे उलगडण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गात मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं लोकार्पण डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं. पण अवघ्या आठ महिन्यांनी 26 ऑगस्ट 2024 ला शिवरायांचा हा 35 फुटांचा भव्य पुर्णाकृती पुतळा कोसळला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. या घटनेमुळे राज्य सरकारही कोंडीत सापडलं होतं. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची आणि शिवप्रेमींची माफी मागितली होती. तसेच पुतळा कोसळल्याच्या घटना प्रकरणाची सविस्तर तपास करणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं.
या प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे हा घटना घडल्यापासून फरार होता. त्यामुळे राज्य सरकारनेच त्याला लपवून ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. दुसरीकडे पोलिसांनी जयदीपच्या शोधासाठी सात वेगवेगळी पथक तैनात केली होती. जयदीप आपटेवर गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर जयदीप याचे कुटुंबिय शहापूरला नातेवाईकांकडे गेले होते. पण पोलिसांनी तिथे जावून जयदीपची पत्नी आणि आईची चौकशी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जयदीपची आई आणि पत्नी कल्याण येथील राहत्या घरी आले होते. पोलिसांनी तिथे देखील त्यांची चौकशी केली होती. जयदीप सापडत नसल्याने पोलिसांनी लुकआऊट नोटीसही जारी केली होती.