विरारः नकली बंदुकीचा (Dup;icate Gun) धाक दाखवून, ज्वेलर्समधील सोने (Gold theft) पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत चोरट्या महिलेला ज्वेलर्स मालकाने मोठ्या धाडसाने पकडले आहे. चोरटी महिला आणि ज्वेलर्स मालक यांच्या झटापटीचा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या असे प्रकार वाढत असून अशा भूरट्या चोऱ्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये होत आहे.
या प्रकरणाबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. नकली बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या महिलेन दुकानात एकटाच मालक असल्याने आणि बाहेरील परिस्थितीचा हाकहवाला घेऊनच हे धाडस केले आहे मात्र दुकानदाराच्या धाडसामुळे महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विरार पश्चिम ग्लोबल सिटी परिसरात देवनारायण ज्वेलर्सच्या दुकानात आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुपारची वेळ असल्याने दुकानांंमध्ये आणि रस्त्यावरही वर्दळ कमी होती. त्यामुळेच अशा चोऱ्या करणाऱ्यांची संख्या परिसरात वाढली असल्याचे बोलले जात आहे.
एक महिला काळा बुरखा घालून, दागिने खरेदीसाठी ज्वेलर्समध्ये आत शिरली होती. लग्नासाठी दागिने खरेदी करायचे असे सांगून, जवळपास दोन तास दुकानात दागिने पाहत होती. दुकानात आणि रस्त्यावर कुणी नाही हेरून, तिने स्वतः जवळच्या पिशवीतून एक नकली पिस्तुल काढून, पिस्तुलीच्या धाकावर ज्वेलर्सचं दुकान लुटण्याचा प्रयत्न केला.
मात्र दुकानाचे मालक देवीलाल गुर्जर यांच्या धाडसामुळे तिचा हा प्रयत्न फसला. देवीलाल यांनी महिलेच्या हातातून पिस्तुल हिसकावून, तिचे केस पकडून तिला पकडून ठेवून, अर्नाळा पोलिसांच्या हवाली केले आहे.