आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील राजकारण तापायला लागलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर काल ठाण्यात मनसैनिकांनी हल्ला केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपारी फेकल्यानंतर ठाण्यात मनसैनिक आक्रमक झाले. मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर टमाटे, शेण, नारळ फेकले. त्यामुळे ठाण्यात मोठा तणाव निर्माण झालाय. उद्धव ठाकरे यांच्यावरील हल्ल्यानंतर आता पोलीस आता सतर्क झाले आहेत. पोलिसांनकडून उद्धव ठाकरेंवरील हल्ला प्रकरणी कारवाई सुरु झाली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे मुख्य आरोपी आहेत. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या एफआयआर दाखल केले आहेत, ज्यामध्ये 44 जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या केसमध्ये कलम १८९ (२) ,१९० ,१९१ (२) ,१२६ (१), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ पोट कलम (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी 32 महिलांसोबत 12 पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना रात्री सोडण्यात आले. ते दुसऱ्या केसमध्ये कलम ६१ (२) १२५,१८९(२) ४९ ,१९०, १९१ (२), ३२४ (४) पोलीस अधिनियम 1951 कलम ३७ पोट कलम (१), (३) सह १३५ प्रमाणे अविनाश जाधव यांच्यासह मनसे कार्यकर्ते प्रीतेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलू, मनोज चव्हाण यांना आरोपी करण्यात आले आहे.
महत्त्वाचे, हे सर्व गुन्हे जामीन पात्र गुन्हे असले तरी सदर घटनेच्या अनुषंगाने ठाणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच तणावाची परिस्थिती पाहता सदर आरोपीस अटक करून परिस्थिती शांत करण्याकरिता नौपाडा पोलीस ठाण्यात DCP, ACP आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यामध्ये बैठक पार पडली. आरोपींविरुद्ध कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.