ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मोठा दावा केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्यावर हल्ला करण्यासासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला (Raja Thakur) सुपारी दिल्याचा धक्कादायक दावा संजय राऊतांनी केलाय. राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र दिले आहेत. या पत्रावर फडणवीसांनी राऊतांची खिल्ली उडवली. राऊत हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचे दावे करत असल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे राऊतांनी ज्या गुंडाचा उल्लेख केलाय त्याने आपण राऊतांविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचं म्हटलंय.
राजा ठाकूर याची सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या ऑडिओ क्लिपमध्ये राजा ठाकूर यांना संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ते आरोप खोटे असल्याचं ठाकूर म्हणतो. याशिवाय आपण संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचं राजा ठाकूरने सांगितलं.
‘टीव्ही9 मराठी’चे प्रतिनिधी गणेश थोरात यांनी राजा ठाकूर यांना फोन करुन व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपबद्दल विचारणा केली असता आपण संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा करु, या वृत्ताला दुजोरा दिला.
राजा ठाकूर हा ठाणे, कळवा आणि मुंब्रा भाग्यातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर ठाणे, नवी मुंबईत हत्या, हत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
राजा ठाकूर हा 2011 च्या दीपक पाटील हत्या प्रकरणाती आरोपी आहे. ठाकूरकडून पाटील हत्या प्रकरणातील साक्षीदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.
दीपक पाटील हत्या प्रकरणात जन्मठेपाची शिक्षा देखील झालेली. पण हायकोर्टात अपील केल्यानंतर 2019मध्ये तुरुंगातून बाहेर आला.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे
– आपला नम्र- संजय राऊत