ठाणे : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रखरखत्या उन्हात बसलेल्या 12 भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. पैसे देऊन आमची माणसे परत येणार आहेत का? असा टाहो कळव्यातील दोन मृतक आईंच्या मुलींनी सरकारकडे फोडला आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या आईचा जीव गेला असल्याचा आरोप आता मृतांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी खारघर येथे आले होते. आपल्या गुरुला सन्मानित करताना याची देही याची डोळा पाहण्यासाठी तब्बल २० लाख श्री सदस्यांची उपस्थिती असल्याचे बोलले जाते.
शासन यंत्रणेने आयोजनाची सर्व तयारी पूर्ण केली होती. परंतु कार्यक्रमात भर उन्हात श्री सदस्यांना तब्बल सहा-तास बसवून ठेवले. परिणामी 12 श्री सदस्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. कळवा परिसरात राहणाऱ्या भीमा साळवी तसेच पुष्पा गायकर या देखील या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताच्या बळी ठरल्या आहेत.
रात्री उशिरापर्यंत या दोघीही घरी परतल्या नाहीत. म्हणून ज्योत्सना हांडे आणि सारिका पाटील या दोन्ही मुलींनी आपल्या-आपल्या आईंची शोधाशोध करायला सुरुवात केली. सुरुवातीला कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यांना त्रास झाला त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. मात्र त्या ठिकाणीही या दोघीना त्यांच्या आई सापडल्या नाहीत .
पोलीस स्टेशन , हॉस्पिटल अशी अनेक ठिकाणे शोधल्यानंतर अखेर एका रुग्णालयात शोध लागला. मात्र रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले होते. आई या जगात नसल्याचे समजताच दोन्ही मुलींच्या पायाखालची जमीन सरकली. सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर संताप व्यक्त करत जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेता तर नियोजन व्हायला हवे होते.
आमचा माणुस गमावला. यातून तुम्ही समाजकारण केले की राजकारण केले आम्हाला माहीत नाही. मात्र माणसांचा जीव जाईल असे नियोजनशून्य कार्यक्रम यापुढे घेऊ नका. असा संताप मृत भीमा साळवी यांची मुलगी ज्योत्सना हांडे यांनी केला आहे. तर, सरकारला एवढंच सांगेन की सरकारच्या हलगर्जीपणामुळे आमच्या माणसांचा जीव गेला.
ही वेळ जेव्हा स्वतःवर येईल तेव्हा बघा काय होतंय. असा प्रश्न उपस्थित करत आमची कुटुंबप्रमुख आमची आईच होती. त्यामुळे पैशांची मदत करण्यापेक्षा आमच्या भावांना सरकारी नोकरी लावली तर आमच्या आईला खरी श्रद्धांजली मिळेल. अशी भावना मृत पुष्पा गायकर यांची मुलगी सारिका पाटील यांनी सरकारकडे केली आहे.