ठाणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्री व जनावरांसाठी सुसज्ज पशुवैद्यकीय हॉस्पिटल उभारण्यासाठी तरतूद करावी. अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये श्वानदंशाच्या घटनाही नोंदविल्या गेल्या आहेत. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे हाल होतात. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेकडून कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू आहे. परंतु, त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही.
शहरात भटक्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मर्यादा येतात. शहरातील रस्त्यांवरील अपघातात एखादा कुत्रा मृत्युमुखी पडल्यानंतर तो डंपिंग ग्राऊंडवर नेला जातो. रस्त्यावर कुत्रा वा जनावर पडून राहिल्यास त्या परिसरात दुर्गंधीही निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मृत जनावरांच्या दहनासाठी विद्युतदाहिनी निर्माण करण्याची गरज आहे, असे मनोहर डुंबरे यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबई महापालिकेने भटक्या कुत्र्यांवर उपचारासाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातही रुग्णालय उभारल्यास आजारी कुत्रे व जनावरांवर उपचार करण्याबरोबरच नसबंदीही करता येईल. तसेच शववाहिनीच्या माध्यमातून मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यास मदत होईल.
शहरात मृत जनावरांच्या प्रेताची विल्हेवाट लावणे कठीण काम आहे. डम्पिंग यार्डवर अशी मृत जनावरं फेकले जातात. त्यामुळं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. याचा नागरिकांनाच त्रास सहन करावा लागतो. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. या कामासाठी काही स्वयंसेवी संस्थाही पुढाकार घेऊ शकतील. तरी या संदर्भात आपण जनावरांसाठी सुसज्ज रुग्णालय व शववाहिनी सुरू करावी, अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.
शहरातील काही भागात भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होतो. भटके कुत्रे केव्हा हल्ला करतील काही सांगता येत नाही. अशावेळी त्यांची नसबंदी करणे गरजेचे आहे. अन्यथा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यास सामान्य व्यक्तीला अतिशय त्रास होतो. मधातच कुत्रे येऊन जाणाऱ्यांवर विनाकारण भुंकत असतात. अपघात होण्याची शक्यता असते. सायकल चालकांवर कुत्रे धावून पडतात.