ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांना ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही वर्तक नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन महेश आहेर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ऋता यांनी पोलिसांना आहेर यांच्याविरोधातील सर्व पुरावे आणि कथित ऑडिओ क्लिपही दिली आहे. तसेच आता पोलीस काय कारवाई करणार हे आम्ही पाहत आहोत, असं ऋता यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड आणि त्यांची मुलगी नताशा आव्हाड रात्री उशिरा वर्तक पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी कथित ऑडिओ क्लिपद्वारे आमच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याविरोधात आम्ही आहेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वर्तक नगर पोलीस ठाण्यात आलो आहोत, असं ऋता आव्हाड यांनी सांगितलं.
आमच्याकडे पुरावा आहे. पोलीस काय कारवाई करणार हे आम्ही पाहणार आहोत. सगळीकडे तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शस्त्र कुणाकडे होते हे सर्वांनी पाहिलं आहे. हल्ला झाला आहे तेव्हा आव्हाड समर्थकांकडे शस्त्र नव्हते. उलट रिव्हॉल्वर कुणाकडे होतं हे सर्वांनी पाहिलं आहे. हल्ला कधी झाला हे आव्हाड यांना माहीतही नव्हतं, असा दावा ऋता आव्हाड यांनी केला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यक आयुक्तांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले. आम्हीही जनता आहोत. तुम्ही सर्व प्रजेला समान वागणूक दिली पाहिजे. तरच तुम्हाला राजा म्हणायला आनंद होईल. थोबाडीत मारल्याने 307 गुन्हा दाखल करण्यात आला. लोकांच्या घराला आगी लावून मारलं जात आहे. त्यांच्यावर मात्र कारवाई करण्यात येत नाही. रोज एक नवा ड्रामा तयार होत आहे, असं त्या म्हणाल्या.
सत्तेच्या नशेत आहेर बोलत आहेत. दारूच्या नशेत बोलत आहेत. ऑडिओ क्लिपमधील आवाज महेश आहेर यांचाच आहे. पोलिसांनी तो तपासला पाहिजे. ते बाबाजी यांच्या जमिनीबाबत बोलत आहेत. आव्हाड यांना मारण्याची धमकी देत आहेत.
याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्लिपची चौकशी केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असं त्या म्हणाल्या.
माझ्या जवायला माझ्यावर विश्वास आहे अस तो बोलतो. कारण मी डॉन आहे, असं त्याचं म्हणणं आहे. माझ्या जावयाला याबाबत काहीच माहीत नाही. हा सर्व पुरावा हाती असताना पोलीस काय करणार हा प्रश्न आहे. काल त्याने आमच्या एका कार्यकर्त्याला फोन केला. मी आव्हाड यांना ठोकणार… नंतर तुझा नंबर आहे, अशी धमकी त्यांनी दिली, असा दावा त्यांनी केला.
उघड उघड धमकी देण्याची यांची हिंमत कशी होते? आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाणार. आता माझ्या कुटुंबाविरोधात येणाऱ्यांना माझं चॅलेंज आहे. जनाची नाही तरी मनाची ठेवा. तुम्हालाही कुटुंब आहे.
आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही कोर्टात धाव घेणार, असं सांगतानाच तुमच्या नावाचा वापर होतोय. त्याविरोधात कारवाई करा, हे माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, असं आवाहन त्यांनी केलं.