राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील घरी जात सदाभाऊ खोत त्यांना भेटले आहेत. मतदार संघातील काही प्रश्न संदर्भात मी या ठिकाणी आलो होतो. राज्यामध्ये महायुतीचं वातावरण चांगलं आहे. गाव खेड्यातले शेतकरी हे महायुती बरोबर आहेत. यामुळे निश्चितपणे चांगले यश महायुतीला मिळेल, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. तसंच महाविकास आघाडीवरही सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे.
मागच्या सरकार वेळी शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतात सडून नुकसान झालं. आमच्या सरकार आलं आणि एका बाजूला कांद्याचे भाव वाढले तर ऊस, दूध, सोयाबीनसारखे अनेक पिकांवरती सरकार सूट देत आहे. सरकार देखील त्यांना अनुदानही देत आहे. महायुतीच्या काळात चांगले निर्णय झाले. महाविकास आघाडीच्या काळात चांगले निर्णय घेतले नव्हते. त्यांना फक्त खायचं आणि लुटायचं माहिती आहे. त्यामुळे परत राज्य लुटायला मिळावं यासाठी त्यांची चाललेली ही धडपड आहे, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
राज्यात सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे. असं असताना राज्यात कोण सत्तेत येणार? कुणाचा मुख्यमंत्री होणार? याबाबत चर्चा होतेय. यावर सदाभाऊ खोत यांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री कोण असावा, कोण नसावा हा विषय आमच्याकडे नाही आमचे नेते एकनाथ शिंदे अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत. एकमेकांना समजून घेऊन राज्य पुढे घेऊन जायचं आहे, असं खोत म्हणाले.
महायुतीचा मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून आमच्याकडे एकनाथ शिंदे सध्या काम करत आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदा चेहरा कोणता ते त्यांही जाहीर करावा. आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आमचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणुका झाल्यानंतर आमचे नेता सक्षम आहेत. आमच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सी खेच नाही सामान्य जनतेच्या विकासासाठी रस्सी खेच आहे, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.