ठाणे जिल्ह्यातील शहापुरात पंडीत नाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानातील विक्री प्रतिनिधीवर गोळीबार झाला होता. सोनाराची बॅग हिसकावण्यात आली होती. यामध्ये दिनेश कुमार मानाराम चौधरी (वय25) याचा मृत्यू झाला होता. ही घटना 21 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजता घडली होती. या खूनाचा उलगडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने केला. पोलिसांनी एका क्ल्यूवरून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांना उत्तर प्रदेशामधून अटक केली. याप्रकरणात शहापुर पोलीस ठाण्यात जबरी चोरीसह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
12 पथके आरोपींच्या मागावर
सरत्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या या जबरी चोरीने पोलिसांनाच आव्हान दिले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, मा. अपर पोलीस अधिक्षक भरत तांगडे, यांनी घटनास्थळावर भेट देवुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, शहापुर पोलीस ठाणे, वाशिंद पोलीस ठाणे, पडघा पोलीस ठाणे, कसारा पोलीस ठाणे, भिवंडी तालुका पोलीस ठाणे, किनवली पोलीस ठाणे, सायबर विभाग अशी एकुण 12 पथके तयार करण्यात आली होती.
आणि मिळाला क्ल्यू…
या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पथकांनी सीसीटीव्ही च्या माध्यमातून, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी काही दिवस भिवंडी येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. हा क्ल्यू मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवली. आरोपी ह उत्तर प्रदेशातील कौसंबी येथील असल्याचे तपासात समोर आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक महेश कदम व शहापुर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ उत्तर प्रदेश येथे रवाना झाले.
दोघांच्या आवळल्या मुसक्या
उत्तर प्रदेश येथे गेलेल्या पथकाने प्रयागराज येथील स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने वरील गुन्हयातील संशयीत आरोपी सशांक उर्फ सोनू बलराम मिश्रा (वय-३२ रा. बंधवा राजवर, मंझनपुर जि. कौसंबी उत्तर प्रदेश) याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आरोपी अंकीत उर्फ सिंदू यादव (रा. कोकराज जि. कौसंबी) व फैजन पप्पु सिद्धकी (जि. कौसंबी) यांचे मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. उत्तर प्रदेशातून आरोपींना अटक करण्यात आली. शहापुर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता आरोपींना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.