खड्ड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेनेचं मनसेला जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Sep 30, 2021 | 4:53 PM

खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. खड्डे भरा नाही तर तुम्हाला खड्ड्यात भरू, असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी काल दिला होता. (shiv sena reply to mns over potholes issues in kalyan)

खड्ड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेनेचं मनसेला जोरदार प्रत्युत्तर
dipesh mahatre
Follow us on

कल्याण: खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. खड्डे भरा नाही तर तुम्हाला खड्ड्यात भरू, असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी काल दिला होता. त्यानंतर आज शिवसेनेने त्यावर पलटवार केला आहे. खड्ड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये, असा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनिी दिला आहे.

दीपेश म्हात्रे यांनी मीडियाशी संवाद साधताना मनसेवर जोरदार टीका केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 2010 सालच्या निवडणूकीत मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते. 2015मध्ये मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे मनसे हाच खड्ड्यात गेलेला पक्ष आहे. त्याने कोणाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये, असा म्हात्रे यांनी दिला आहे. मनसेचेही नगरसेवक महापालिकेत होते. त्यावेळी त्यांनी का कधी खड्ड्यांवरून पालिकेत आवाज उठवला नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.

2014 साली महापालिका हद्दीत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामावर 21 कोटी रुपये खर्च केले जात होते. त्यानंतर महापालिका हद्दीत काही रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले. त्यामुळे 2014 सालानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा खर्च कमी कमी होत गेला आहे. रस्ते विकासासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे 360 कोटींची रस्ते विकासाची कामे लवकर सुरु होणार आहेत. त्यामुळे खड्डे बुजविण्यावरील खर्च आणखीन कमी होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

साळवी आणि आयुक्तांची चर्चा

दरम्यान, आज शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे. या भेटीदरम्यान शहरातील कचरा आणि महापालिका हॉस्पिटलच्या समस्येवरही चर्चा करण्यात आली. यावेळी विजय साळवी, माजी नगरसेवक जयवंत भोईर, महेश गायकवाड, रघुनाथ भोईर, अरविंद मोरे, मोहन उगले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सत्तेत असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी आयुक्तांची भेट घ्यावी लागते याविषयी विरोधी पक्षाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राजू पाटील यांचा आरोप काय?

राजू पाटील यांनी काल मलंगगड रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि पालिकेवर जोरदार टीका केली होती. कल्याण-डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्याबाबत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर 114 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च केल्याचं दिसतंय का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. खड्डय़ाचे सोडा पालिकेतील अधिकारी बिले काढण्यासाठी 2 टक्के घेतात. सगळीकडे अडवणूक, फसवणूक सुरू आहे. एक तर लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासक आहे. कशाला कशाचा पायपोस नाही. खड्डे बुजविण्यासाठी आठ वर्षात 114 कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी हीच परिस्थिती असते. त्यामुळे आता यांनी खड्डे भरावेत नाही तर आम्हालाच यांना खड्ड्यात भरावे लागेल, असा संतप्त इशारा त्यांनी दिला. आम्ही काय करू शकतो हे सर्वांना माहीत आहे. आमच्यावर केसेस केल्या तरी करू द्या. आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. कल्याणमध्ये सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली होती.

ब्लॅकलिस्टेड कंपनीला रस्त्याचे काम

कल्याणच्या मलंग रस्त्यावर 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. तरीही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. 31 मे 2019 रोजी हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याला वाढीव पैसे दिले जात आहेत. तसेच कंत्राटदाराला मुदतवाढ दिली असून तीही संपुष्टात आली आहे. बहुतेक त्याला मुदतवाढ देणारा खाल्ल्या मिठाला जागत असावा. या रस्त्याच्या कामाचे 95 टक्के बिल कंत्राट कंपनीला आधीच दिले गेले आहे. हे काम ज्या कंत्राट कंपनीला दिले होते. ती रेलकॉन कंपनी मुंबईत ब्लॅकलिस्टेड आहे. ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हीच परिस्थिती होणार. मलंग रस्त्याचीच नव्हे संपूर्ण कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची अवस्थाही अत्यंत खराब आहे. पालकमंत्र्यांनी वेळ काढून या खड्ड्यांची पाहणी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

 

संबंधित बातम्या:

कल्याणमधील खड्डे भरा नाही तर तुम्हालाच खड्ड्यात भरू; मनसे आमदार राजू पाटील संतप्त

आणि भाजप उमेदवाराच्या पोस्टरवर अडगळीत पडलेले राज ठाकरे राड्यानंतर मोठे झाले?, वाचा नेमकं काय घडलं?

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्लानिंग करा, कायदा राबवण्याची वेळ येऊ देऊ नका; एकनाथ शिंदेंची अधिकाऱ्यांना तंबी

(shiv sena reply to mns over potholes issues in kalyan)