ठाणे : उल्हासनगरात उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी (Shivsainik) पोलीस ठाण्यावर धडक दिली. युवासेना शहरप्रमुखांवर खोटा गुन्हा दाखल करून त्याआधारे जुन्या गुन्ह्यातील बॉण्ड रद्द करण्याचे पोलिसांचे षडयंत्र असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर उल्हासनगरात असलेले खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे कार्यालय 25 जून रोजी निष्ठावंत शिवसैनिकांनी फोडले होते. त्या प्रकरणात युवासेना शहरप्रमुख बाळा श्रीखंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात बाळा श्रीखंडे यांची बॉण्डवर सुटका करण्यात आली होती. मात्र त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी युवासेनेच्या एका कार्यकर्त्याने उल्हासनगर पोलीस (Police) ठाण्यात बाळा श्रीखंडे यांच्याविरोधात एनसी दाखल केली. ज्यात ‘शिंदे गटात काम करशील तर पाय तोडू’, अशी धमकी बाळा श्रीखंडे यांनी दिल्याचा आरोप तक्रारदार युवा सैनिकाने केला.
या तक्रारीनंतर सोमवारी 12 सप्टेंबर रोजी बाळा श्रीखंडे यांना या एनसीच्या आधारे खासदार कार्यालय तोडफोड प्रकरणातील बॉण्ड रद्द करण्याची नोटीस देण्यात आली. त्यामुळे आज शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी सभागृह नेते धनंजय बोडारे यांच्यासह पदाधिकारी आणि महिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी बाळा श्रीखंडे आणि संबंधित तक्रारदार युवासैनिक याची गेल्या महिन्याभरात गाठभेटही झाली नसून ही एनसी खोटी असल्याचा दावा शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. तसेच हे पोलिसांचे षडयंत्र असून हे कुणाच्या सांगण्यावरून केले जात आहे, हे जनतेला ठाऊक असल्याचे ते म्हणाले.
पोलीस ही जी शाळा करत आहेत, त्याचे आम्ही हेडमास्तर होतो. त्यामुळे पोलिसांनी अशी षडयंत्र केल्यास आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशाराही राजेंद्र चौधरी यांनी दिला. तर पोलिसांचा सन्मान राखणे ही आम्हाला बाळासाहेबांची शिकवण असून पोलिसांनी जाणीवपूर्वक अशी कृत्य करू नयेत, तसेच हा गुन्हा पूर्णपणे खोटा आहे, असे माजी सभागृह नेते धनंजय बोडारे यांनी सांगितले.
याप्रकरणी उद्या सहायक पोलीस आयुक्त आणि परवा पोलीस उपायुक्त यांचीही भेट घेणार असल्याचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे खासदार कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शिवसैनिकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली होती. त्या प्रकरणात खुद्द शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता शिंदे गट आणि निष्ठावंत शिवसैनिक यांच्यात सुरू असलेला हा संघर्ष कधी थांबतो आणि याच्यावर पोलीस काय तोडगा काढतात, हे पाहावे लागणार आहे.