कल्याण: मला पक्षाच्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. त्यामुळे मी जात नाही. बोलावलं तर जाईल, अशी खंत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केली आहे. तसेच मी कुठे जात नाही. पण माझा निर्णय घेण्यास मी सक्षम आहे, असं सूचक विधानही भोईर यांनी केलं आहे. त्यामुळे भोईर हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. भोईर भाजपमध्ये गेल्यास ते भाजपचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात अशीही जोरदार चर्चा सुरू आहे.
2019मध्ये पार पाडलेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेकडून सुभाष भोईर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ही उमेदवारी नंतर रद्द करण्यात आली. त्यानंतर आज भोईर यांनी भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागातील कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याविषयी त्यांना विचारले असता अशी कुठली चर्चा नसल्याचे सांगून त्यांनी काही सूचक विधानेही केली आहेत.
राज्यात भाजप हा शिवसेनेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. असं असतानाही सुभाष भोईर थेट भाजप नगरसेवकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आलं. त्यामुळे माध्यमांनीही भोईर यांनी तात्काळ गराडा घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात का? भाजप नगरसेवकाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यामागचं कारण काय? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर भोईर यांनी अशी कुठली चर्चा नाही. मी जिथे आहे. त्याठिकाणी योग्य आहे. योग्य वेळी निर्णय घेता येईल. त्याची आताच कशाला घाई पाहिजे. मी स्वयंभू आहे. मी कोणाच्या कुबड्या घेऊन पक्षात आलेलो नाही. मला पक्षाच्या कार्यक्रमात बोलविले जात नाही. त्यामुळे मी जात नाही. मला बोलविले तर मी जाईन, असं सूचक विधान त्यांनी केलं.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतील काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागातील विकास कामाकरीता माजी आमदार भोईर यांनी निधी दिली होता. त्या कामाच्या लोकार्पण प्रसंगी भोईर हे उपस्थित होते.
भोईर यांना शिवसेनेने विधानसभेच्या निवडणूकीसाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. मात्र त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. शिवसेनेने त्यांची उमेदवारी रद्द करुन रमेश म्हात्रे यांना दिली होती. त्यामुळे भोईर हे दुखावले गेले होते. त्यांच्या मनातील खदखद त्यांनी त्याचवेळी एका प्रचार सभेत बोलून दाखविली होती. आता भोईर हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा निवडणूकीच्या तोंडावर केल्या जात आहेत. भोईर यांनी अशीही कुठलीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केल असले तरी दुसरीकडे त्यांना पक्ष कार्यक्रमात बोलावलं जात नाही. हे देखील बोलून दाखविले आहे. तसेच ते स्वयंभू असल्याचे म्हटले आहे. याशिवाय योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सुतोवाचही त्यांनी केले आहे. त्यामुळे योग्य वेळी भोईर कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 10 December 2021 pic.twitter.com/xTRy85WA1r
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 10, 2021
संबंधित बातम्या:
Mohan Bhagwat: अण्णा भाऊ साठेंप्रमाणेच सावरकरांचं कर्तृत्व, दोघांमध्ये काहीच फरक नाही: मोहन भागवत
Omicron : मुंबईत आणखी एकाला ओमिक्रॉनची बाधा, वैद्यकीय विभागानं रुग्णालयात केलं दाखल