ठाणे : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल अखेर लवकरच सुरु होणार आहे. येत्या गणेश चतुर्थीच्या आधी हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे. डोंबवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा पूल गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. कल्याणचा पत्रीपूल जसा चर्चेचा विषय ठरला तसाच आता कोपर पूल चर्चेला कारण ठरु लागला आहे. कारण या पुलाचं दोन वर्षांपासून काम सुरु आहे. त्यामुळे आता शिवेसेनेकडून जी माहिती देण्यात आली आहे ती खरी ठरली तर गणपती बाप्पा खरंच पावला, अशी भावना डोंबिवलीकरांची राहील.
या पूलावर क्रॉंक्रीटीकरणाचे काम आज (27 जुलै) सुरु करण्यात आले. या पुलासाठी केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी 15 जुलैपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या पूलाचे काम संथगतीने सुरु होते. वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा आहे. गणेश चतुर्थीच्या आधी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलाची पाहणी आज दिपेश म्हात्रे यांच्यासह भाजपचे मंदार हळबे यांनी केली.
डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा कोपर पूल डोंबिवलीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हा पूल धोकादायक झाल्याने हा पूल रेल्वे आणि महापालिकेच्या वतीने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. या पूलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. पुलाचे डिझाईन तयार करणे, त्यासाठी कंत्रटदार नेमणे, त्याचा खर्च रेल्वे आणि महापालिकेने निम्म-निम्मा उचलणे या प्रक्रिया पार पडल्या. पुलाच्या कामाची निविदा काढण्यात आली. या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी जूना पूल पाडण्याचे काम एप्रिल 2020 मध्ये महापालिकेच्या वतीने करण्यात आले.
“कोरोना काळात पूलाचे काम संथ गतीने सुरु होते. त्यानंतर पूलासाठी आवश्यक असलेले गर्डर मागविण्यात आले. गर्डर चढविण्यात आल्याने आता पुलाचे गर्डरवर सिमेंट कॉंन्क्रीटीकरणाचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. पुलाच्या कामाची डेडलाईन वारंवार बदलत राहिली. त्याचे कारण पुलाच्या कामात अनंत अडचणी आल्या. तसेच कोरोना काळात कामात अडथळे असताना काम उचलण्यात आले. आता पूलाचे सिमेंट कॉंन्क्रीटीकरण केल्यावर पूलाचे काम गणेश चतुर्थीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. पूल वाहतूकीसाठी खुला केला जाईल”, अशी माहिती शिवसेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे.
हेही वाचा : पूरग्रस्तांसाठी नाशिक मनसे मैदानात, चिपळूणच्या नागरिकांना मदतीसाठी मनसे कार्यालयाचं वॉर रुममध्ये रुपांतर